अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-हॉटेलसमोर लावलेली चारचाकी गाडी बाजूला घे, असे म्हटल्याचा राग येवून सात ते आठ जणांनी मिळून एकास लाथाबुक्यांनी व लोखंडी रॉडने केलेल्या जबर मारहाणीत गंभीर जखमी होवून उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला.
ही घटना पाथर्डी तालुक्यातील फुंदेटाकळी फाटा येथील हॉटेल साई प्रेम येथे घडली. विश्वनाथ कारभारी फुंदे (वय ४१ वर्षे रा.फुंदेटाकळी फाटा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी सात ते आठ जणांवर पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वनाथ कारभारी फुंदे यांचे फुंदेटाकळी फाटा येथे साईप्रेम नावाचे हॉटेल आहे. शुक्रवारी सकाळी विश्वनाथ फुंदे व त्यांचा भाचा अशोक खेडकर हे हॉटेलमध्ये होते. सुधीर संभाजी शिरसाट (रा. शिरसाटवाडी, ता.पाथर्डी) याने हॉटेलसमोर चारचाकी गाडी लावली.
त्यावेळी विश्वनाथ फुंदे यांनी सुधीर शिरसाटला गाडी बाजुला घेण्याचे सांगितले. याचा राग आल्याने सुधीरने विश्वनाथ फुंदे यांना मारहाण केली. सुधीर शिरसाटने फोन करुन त्याचे सात ते आठ साथीदार बोलावले.
त्यांनी सर्वांनी मिळुन लोखंडी रॉड व लाथाबुक्याने पुन्हा विश्वनाथ फुंदे यांना मारहाण केली. त्यानंतर सुधीर शिरसाटच्या चारचाकी गाडीत घालुन विश्वनाथला पाथर्डीत आणले. श्रीतिलोक जैन विद्यालयाच्या पटांगणात पुन्हा मारहाण करुन विश्वनाथला दारू पाजली.
दरम्यान विश्वनाथ फुंदे यांचे भाऊ व नातेवाईक तेथे आले त्यांनी फुंदे यांना पोलिस ठाण्यात नेले तेथुन पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथुन नगरच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यानंतर विळद घाटात विखे फाउंडेशन व तेथुन नोबेल हॉस्पिटलला नेले.
तेथील डॉक्टरांनी फुंदे यांना मृत घोषीत केले. याबाबत मच्छद्रिं कारभारी फुंदे यांनी सुधीर शिरसाट व त्याचे सात ते आठ साथीदाराविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान सुधीर शिरसाट व त्याचे साथीदार वाळु तस्करी करतात.
वाळूतून पैसा व पैशातुन मस्ती वाढते. त्यातूनच हा खून झाला आहे. काही पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल होवु नये यासाठी दबाव आणल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.