अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :-मुळा धरणात बुडालेल्या येथील मित्राला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना पाण्यात बुडालेल्या राहुरीच्या तरुणाचा मृतदेह तब्बल २९ तासांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाण्यावर तरंगताना आढळून आला.
१५ ऑगस्टला दुपारी १२ वाजता मुळा धरणाच्या चमोरी गेष्ट हाऊस समोरील पाण्यात ही दुदैवी घटना घडली. राहुरीतील हाॅटेलवर काम करणारे चार मित्र मुळा धरणावर गेले होते.
यावेळी दोघांना धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. रावसाहेब मते रा. राहुरी (मुलनमाथा) व बिरेंदर रावत रा. उत्तराखंड हे चमोरी गेस्ट हाऊस समोरील पाण्यात उतरले.
पाण्याचा अंदाज न आल्याने बिरेंदर याने पाण्यात गटंगळ्या खाल्ल्या. मित्र पाण्यात बुडत असल्याचे लक्षात आल्याने रावसाहेब याने बिरेंदरला वाचवण्याचा प्रयत्न केला.
मदतीसाठी होडीतून आलेल्या विकास गंगे, शक्ती गंगे, आदेश गंगे व इतर मच्छिमारांनी बिरेंदरला पाण्यातून होडीत घेतल्याने त्याचा जीव वाचला. मात्र बिरेंदरला वाचवणारा रावसाहेब हा पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मुळानगर येथील रहिवाशी आदेश गंगे, शक्ती गंगे,अरूण बर्डे, अशोक बर्डे, हारजीत माळी, विजय माळी, किशोर बर्डे, शिवदास बर्डे,
करण सुर्यवंशी यांच्या मदतीने रावसाहेबचा शोध सुरू केला. सायंकाळी अंधारामुळे शोधकार्यावर मर्यादा आल्याने सोमवारी दुपारी आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाकडून स्थानिक मच्छीमाराच्या मदतीने शोध सुरू करण्यात आला.अखेर सायंकाळी ५ वाजेदरम्यान मुळा धरणाच्या पाण्यावर रावसाहेब याचा मृतदेह तरंगताना आढळून आला.