अहमदनगर ब्रेकिंग ! डोक्यात दगड घालून तरुणीचा निर्घृण खून

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. किरकोळ कारणातून खुनाच्या घटना जिल्ह्यात घडू लागल्या आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आला आहे.

नुकतेच राहुरी फॅक्टरी परिसरात एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांचा विचार केला असता जिल्ह्यात दररोज कोठेना कोठे हत्याकांड घडत आहे.

यामुळे नागरिक भीतीचे सावटाखाली वावरत आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी फॅक्टरी परिसरात गुंजाळ नाक्याजवळ देशमुख-गिते वस्तीच्या रस्त्यावर नगर-मनमाड महामार्गापासून चाळीस फूट अंतरावर तरुणीचा मृतदेह पडलेला होता.

स्थानिक शेतकरी विशाल गिते यांचे पोल्ट्रीसाठी मध्यरात्री दोन वाजता कोंबडी खाद्याचे वाहन येणार होते. त्यासाठी गिते नगर-मनमाड रस्त्याकडे दुचाकीवर चालले होते. दुचाकीच्या उजेडात त्यांना मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांच्या गस्ती पथकाला माहिती दिली.

तपासकार्य वेगाने सुरु :- घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पथक हजर झाले. आज सकाळी सहा वाजता नगरवरुन फॉरेन्सिक पथक, ठसेतज्ञ व रक्षा नावाच्या श्वानासह पोलीस पथक दाखल झाले.

श्वानाने नगर-मनमाड रस्त्यावर पर्यंत माग दाखविला. घटनास्थळी आढळलेल्या फुटलेल्या दारूच्या बाटलीवरील ठसे व मृतदेहाच्या शेजारी पडलेल्या दगडावरील रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

मृत तरुणीचे वर्णन :- मृताच्या अंगावर पंजाबी ड्रेस असून, नारंगी रंगाची सलवार व गर्द आकाशी रंगाचा कुर्ता आहे. डाव्या हातावर मनगटाच्या खाली इंग्रजी अक्षरात “शितल” व डाव्या हाताच्या अंगठ्या खाली इंग्रजीत “एस.पी.” असे गोंदलेले आहे.

आसपासच्या परिसरातील नागरिकांना तरुणीची ओळख पटली नाही. चारचाकी वाहनातून तरुणीला घटनास्थळी आणून खून केला असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी परिसरातील सर्व लॉजींगमध्ये जाऊन मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.

परंतु, कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वैभव साळवे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24