अहमदनगर ब्रेकिंग : ह्या माजी आमदारांचे निधन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील व श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार अ‍ॅड. दौलतराव मल्हारी पवार (वय ८२) याचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते.पुणे येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. दरम्यान, पुन्हा त्रास जाणवू लागल्याने साखर कामगार रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होत . तिथं आज (दि. १०) दुपारी एक वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

अ‍ॅड. दौलतराव मल्हारी पवार हे शेती आणि पाणी विषयाच गाढे अभ्यासक, विचार जागर मंचचे अध्यक्ष म्हणून ओळखले जात. माजी आमदार दौलतराव पवार यांच्या पश्चात पत्नी सुभद्रा, चार मुले सुधाकर, अ‍ॅड. भागवत, वैज्ञानिक डॉ. शरद व अनिल यांच्यासह सूना, नातवंडे असा परिवार आहे.

सन १९८५ साली श्रीरामपूर संयुक्त मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले. मतदासंघाबाहेरील ते पहिले आमदार होते. सहकारातही त्यांनी मोठे काम केले. येथील मुळाप्रवरा सहकारी वीज संस्थेचे एकदा अध्यक्ष एकदा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कारभार पाहिला. येथील अशोक सहकारी साखर कारखान्याचेही ते काही काळ उपाध्यक्ष होते.

राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, माजी मंत्री गोविंदराव आदिक यांचे ते समर्थक होते. त्यांनी आयुष्यभर काँग्रेस विचारसरणी जोपासली. सह्याद्री पर्वतरांगेतील पुर्ववाहिन्यांचे समुद्रात जाणारे पाणी पश्चिमेकडे वळवावे आणि आवर्षणग्रस्त भागाला ते पाणी पुरवावे, असा प्रस्ताव त्यांनी पहिल्यांदा विधीमंडळात मांडला होता. याप्रश्नी त्यांनी शासनासह न्यायालयीन पाठपुरावा केला.

श्रीरामपूर, राहुरी आणि नेवासा तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या लाख कालव्यांच्या पुनरूज्जीवनासाठी त्यांनी मोठी मोहिम हाती घेतली होती. सक्रीय राजकारणातून बाहेर पडल्यानंतर माजी आमदार दौलतराव पवार सामाजिक जीवनात सक्रीय होते. शेतकरी संघटना, श्रीरामपूर जिल्हा कृती समिती, विचार जागर मंचच्या माध्यमातून ते नेहमी समाजहितासाठी झगडत.

वाचनाचा त्यांना छंद होता.विविध समाजघटकांत लहान-थोरांच्या ते नेहमी संपर्कात असत.त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक वर्तुळात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. उद्या सकाळी नऊ वाजता पुणतगांव (ता. नेवासा) येथील पवार वस्तीशेजारी त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24