अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-शहर व परिसरात अवकाळी पावसाने बुधवारी सायंकाळी हजेरी लावताच शहरातील निम्म्या भागात विजेची बत्ती गूल झाली. काही भागात वीज ट्रीप होत होती.
वीजपुरवठ्याच्या या खेळखंडोब्यामुळे नागरिकांना मात्र गैरसोयींचा सामना करावा लागला. यामुळे ‘वर्क फ्रॉर्म होम’ करणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
नगर शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली.
या वादळी पावसामुळे महावितरणची वीजपुरवठा सेवा कोलमडली. या पावसामुळे सावेडी उपनगरासह निम्मे शहराचा वीजपुरवठा खंडित झाला.
या व्यत्ययामुळे वीजग्राहकांना वीजपुरवठ्याअभावी गैरसोयींचा सामना करावा लागला. महावितरणचे अभियंते, सहाय्यक अभियंता व जनमित्र यांच्या प्रयत्नाने सर्व फिडर्सवरील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर करत होते.
दरम्यान, सायंकाळी ढग दाटून आले,अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरातील विविध भागातील झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. अवकाळी पावसाने सुमारे अर्धातास हजेरी लावली होती.