अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-वेगवेगळ्या बँकांमधून बनावट धनादेशाद्वारे कोट्यवधी रुपये काढण्याचे प्रयत्न करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला दिल्ली येथून अटक करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. विजेन्द्रकुमार उर्फ विजेन्द्र रघुनंदनसिंग दक्ष (३९रा . एन- २ कालकाजी, दक्षिण दिल्ली) असे या आरोपीचे नाव आहे.
यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टोळीतील सहा जणांना अटक केली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, दिल्ली येथून आरोपी विजेन्द्र दक्ष याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.
यानंतर आरोपी दक्ष याला महानगर दंडाधिकारी साकेत न्यायालय परिसर नवी दिल्ली यांच्या न्यायालयात हजर केले.
आरोपीस दोन दिवसाची ट्रन्झीट रिमांड घेऊन त्याला अहमदनगर येथे आणून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला 7 मे रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून महाराष्ट्र तसेच अन्य राज्यातील या प्रकारे विविध गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यासाठी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे हे करत आहेत.