अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- घोडेगाव येथील उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये शनिवारी विक्रमी कांद्याची आवक झाली होती. 19 जून रोजी घोडेगाव येथील कांदा मार्केटला राज्यातील सर्वाधिक विक्रमी ४०० ट्रक (७४ हजार ८७० गोणी) कांदा आवक एकाच दिवशी झाली आहे.
ही आवक राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केटपेक्षा सर्वाधिक अशी होती. यात सुमारे ६ ते ८ कोटी रुपयांपर्यत आर्थिक उलाढाल झाली. उन्हाळी कांद्यास प्रति क्विंटल मोठा कांदा १८०० ते २०००, मध्यम मोठो १६०० ते १८०० रुपये,
मध्यम माल १५०० ते १७००, गोल्टी ५०० ते १४०० रुपये, अपवादात्मक २३०० ते २५०० रुपयाप्रमाणे भाव मिळाला. चांगला भाव मिळाल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले. पुढेही कांदा भावात वाढ होईल, अशी शक्यता कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव येथे सुरू असलेल्या कांदा मार्केटमुळे घोडेगाव व परिसरातील अर्थकारणाला मोठी गती मिळाली. छोटे मोठे हॉटेल व्यवसायिक, दुकानदार, कांदा बारदाना विक्रेते,
हमाल, ट्रक चालक, टेम्पो चालक आदींना रोजगार उपलब्ध झाला. एकाच दिवसात राज्यात सर्वाधिक कांदा आवक होणारे घोडेगावचे कांदा मार्केट आता देशभरात प्रसिद्ध होत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव उपआवार येथील कांदा मार्केटमध्ये खुली लिलाव पद्धत विक्री नंतर तत्काळ पेमेंट व मालास योग्य भाव यामुळे कांदा आवक मोठ्या प्रमाणावर होते.
राज्यात सर्वाधिक कांदा आवक ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. सदैव शेतकरी हितास प्राधान्य दिले जाते, असे नेवासे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी सांगितले.