अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-उसने घेतलेले अडीच लाख रुपये बुडवण्यासाठी वडिलांनीच दहा वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना पुण्यातील श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली.

येथील एमआयडीसी मधील खंडाळा शिवारात प्लॅट नंबर बी. चार / दोनच्या उत्तरेकडील मोकळे जागेत आज (गुरुवारी) पहाटे चार वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.

येथील शहर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला तात्काळ अटक केल्याचे सांगितले. याबाबत सविस्तर बातमी अशी कि मुळचे नाशिक जिल्ह्यातील हिरेनगर (ता. नांदगाव) येथे राहणारे अहिरे पती पत्नी, चार मुलासह श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात मोकळ्या जागेत मेंढ्या घेऊन राहतात.

रात्रीच्या सुमारास सर्व जण झोपलेले होते. त्यावेळी श्रावण बाळनाथ आहिरे याने मुलगा सोपान अहिरे याला गळा दाबून ठार मारले. याप्रकरणी मयत मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी श्रावण बाळनाथ आहिरे (वय. ४०, रा. हिरेनगर, ता. नांदगांव, जि. नाशिक) हल्ली राहणार येथील एमआयडीसी मधील खंडाळा शिवार

याच्या विरुद्ध आज (गुरुवारी) रात्री उशिरा येथील शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या चार मुलासह पती समवेत काल बुधवारी (ता. १) रात्रीच्या सुमारास झोपलेले होते.

त्यावेळी पती श्रावण बाळनाथ आहिरे याने आमचे मालक संतोष गोराणे यांच्याकडून उचल म्हणून घेतलेले अड्डीच लाख रुपये बुडविण्यासाठी माझा मुलगा सोपान आहिरे याचा गळा दाबून ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, अप्पर पोलीस अधिक्षक डाॅ. दिपाली काळे, पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके, पोलिस निरिक्षक संजय सानप यांनी तातडीने घटनास्थळी भेट घेवून पहाणी केली.

त्यानंतर शहर पोलीस पथकासमवेत श्वान पथक, ठशे तज्ञांचे पथक व फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.