राहुरी शहरातील एका कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन कॉलेज तरुणीचे अपहरण केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेबाबत एका संशयित तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन कॉलेज तरुणी राहुरी तालुक्यातील एका परिसरात राहते. ती राहुरी शहरातील एका कॉलेजमध्ये १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.
२५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी सात वाजता सदर कॉलेज तरुणी मला आज कॉलेज मध्ये प्रॅक्टीकल आहे. त्यामुळे मी दुपारी दोन वाजेपर्यंत घरी येईल, असे सांगुन ती घरातुन तिचे सायकलवर कॉलेजला गेली होती.
सायंकाळी सहा वाजेपर्यंत ती कॉलेज तरुणी घरी आली नाही. त्यामुळे तरुणीच्या नातेवाईकांनी तिचा आजुबाजुला तसेच नातेवाईकांकडे व शाळेतील शिक्षक यांच्याकडे चौकशी करुन शोध घेतला.
परंतु ती कोठेही मिळून आली नाही. सदर तरुणी कॉलेजला आलीच नाही. वर्गात तिची हजेरी लागलीच नाही, अशी माहिती तरुणीच्या शिक्षकांनी दिली. तरुणीचा शोध घेत असताना एका तरुणाने आपल्या मुलीचे अज्ञात कारणासाठी अपहरण करुन पळवून नेले.
असा संशय तरुणीच्या नातेवाईकांना आला. मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी किरण कांबळे (रा. श्रीरामपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.