अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- लग्नानंतर अवघ्या दोनच वर्षात विवाहितेचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीला हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा तर त्यास मदत केल्याप्रकरणी सासू-सासरे आणि नणंदेला दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील अच्युत बास्कर काळे (२६) याचे सुनीता सोबत लग्न झाले होते. लग्नानंतर वर्षभरात त्याचे पत्नीसोबत बेबनाव सुरू झाले.
माहेरहून पैसे आणण्याची सतत मागणी करण्यात येऊ लागली आणि पैसे न आणल्यामुळे तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. त्यानंतर हुंड्यासाठी तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता.
या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात पती अच्युत काळे, सासू शकुंतला भास्कर काळे (४२), सासरे भास्कर लक्ष्मण काळे (४५) व नणंद सत्यशीला भोसले(३०) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नगर सत्र न्यायलयाने प्रकरणात पती अच्युत काळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर इतरांना केवळ सहा महिन्यांची शिक्षा दिली होती. दरम्यान जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात पती अच्युतने खंडपीठात अपिल केले.
तर इतर तिघांविरोधात शासनाने शिक्षा वाढीसाठी अपिल केले. हुंडाबळी कायदानुसार शिक्षा देण्यात आली होती परंतु सत्र न्यायालय नगर यांनी पुरावे ग्राह्य धरले मात्र शिक्षा सुनावली नसल्याचा युक्तीवाद सहाय्यक सरकारी वकीलांनी खंडपीठात केला.
मयताला त्रास देण्यात तिघांची भुमिका सारखी असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. प्रकरणात खंडपीठाने आरोपी पतीचे अपिल रद्द केले आणि जन्मठेप कायम ठेवली. सासू-सासरे व नणंदेला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.