Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावात सापडला औरंगजेबाचे नाव असलेला शिलालेख, महत्वाची ऐतिहासिक माहिती समोर

Ahmednagarlive24 office
Published:
shilalekh

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे. अनेक इतिहासकालीन गोष्टीला अहमदनगर हा जिल्हा साक्षीदार राहिला आहे. पेशव्यांचा काळ असो किंवा त्याआधीचा मोघलांचा काळ असो अहमदनगरमध्ये अनेक ठिकाणी त्याच्या पाऊलखुणा आढळतात.

आता अहमदनगर जिल्ह्यामधील कामरगावामध्ये औरंगजेबाचे नाव असलेला देवनागरी लिपीतील शिलालेख आढळला असून तो गावातील एका विहिरीच्या तळाशी बसविण्यात आला असल्याचे आढळले आहे. औरंगजेबाचे नाव असलेले फारसी लिपीतील शिलालेख सहसा आढळून येत असतात परंतु देवनागरी लिपीतील बहुधा हा पहिलाच शिलालेख असल्याचे मत इतिहास संशोधकांनी व्यक्त केले आहे.

या अत्यंत जुना शिलालेख असून याचे वाचन कामरगावमधीलच इतिहास अभ्यासक सतीश भीमराव सोनवणे यांनी केले असल्याची माहिती मिळाली आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीमधील हा शिलालेख छत्रपती असून त्यात असं म्हटलंय की, शक संवताच्या १६१४ व्या वर्षात अंगिरा संवत्सरात वैशाख शुद्ध तृतीयेला शनिवारी औरंगजेब आलमगीरच्या कामरगावातील रहिवासी अब्दुल सलाम ऊर्फ साउजी बापूजी यांनी २५१ रुपये खर्च करून विहीर सयाजी पाटील प्रतापजीने बांधली.

आता यातील काही सालानुसार जर पाहिले तर पिले जंत्रीनुसार शिलालेखाची इंग्रजी तारीख ९ एप्रिल १६९२ अशी येत असल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात. याचा अर्थ असा होतो की ही विहीर तब्बल ३३२ वर्षे जुनी आहे.

पाच ओळींच्या शिलालेखाला ऐतिहासिक संदर्भ
पाच ओळींच्या या शिलालेखाची लिपी देवनागरी असली तरी काही अक्षरे मोडी वळणाची आहेत. शिलालेख खोदीव स्वरूपाचा आहे. यात बाशिंदा हा फारसी शब्द आलेला आहे. ज्याचा अर्थ रहिवासी असा होतो. औरंगजेबाचे मूळ नाव मुहिउद्दीन मोहम्मद होते. त्याचा संक्षेप मु. मो. असा कोरलेला दिसतो. इसवी सन १६८१ मध्ये औरंगजेब दख्खनच्या स्वारीवर आला. त्याच्या आयुष्याची शेवटची २६ वर्षे त्याने इथेच घालवली. परंतु, त्याचा इथे निभाव लागला नाही आणि इसवी सन १७०७ मध्ये नगरजवळ त्याचा मृत्यू झाला.

औरंगजेब दक्षिणेत आला त्यावेळी त्याची जवळ जवळ पाच लाखांची सैन्य छावणी नगरजवळ होती. शिलालेखात उल्लेख असलेले आंधळे घराण्यातील साउजी बापूजी हे त्यावेळी कामरगावचे पाटील होते. त्यांनी इसवी सन १६९२ मध्ये गावात एक पाय विहीर (बारव) बांधली. विहिरीचे बांधकाम अक्षय्य तृतीयेला पूर्ण झाले. गढीचे बांधकाम करताना पाणीपुरवठ्याची सोय म्हणून ही विहीर बांधली असावी. या विहिरीत उतरण्यासाठी पूर्वी पायऱ्या होत्या. नंतरच्या काळात त्या बुजविण्यात आल्या.

विहिरीवरील किंवा बारवेवरील शिलालेख हे सामान्यपणे कमानीवर किंवा विहिरीच्या वरच्या भागात असतात. हा शिलालेख मात्र तळाशी आहे हे आणखी एक वेगळेपण. याच साऊजी बापूजींनी गावात इसवी सन १६९९ मध्ये एक गढी बांधली होती. गढीवरील शिलालेखात मात्र औरंगजेबाचे नाव टाकलेले नाही.

कदाचित त्यांना नाव टाकण्यासाठी सक्ती करण्यात आली असावी. त्यामुळे त्याची जागा दाखवून देण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांनी शिलालेख विहिरीच्या तळाशी बसवला असावा. औरंगजेबाच्या कारवायांपासून गावाचे रक्षण करण्यासाठी साऊजी बापूजी यांनी अब्दुल सलाम हे नाव धारण केले असावे. कारण गढीवरील शिलालेखात फक्त साऊजी बापूजी आंधळे हेच नाव टाकलेले आहे. यात उल्लेख आलेले सयाजी आणि प्रतापजी यांच्याबद्दल माहिती उपलब्ध नाही.

काय आहे शिलालेखाचा मजकूर?
•सके १६१४ अंगिरा संवतसरे वैसाख
सुद्द ३
• सनवार अबदुळ सलाम उर्फ सावजी
• बापुजी बसींदा राजसा औरंगजेब आलमगी
• मु मो, कामरगाव कर्च वीहीर २५१ रुपये
• सयाजी पाटिळ परतापजीने बांधिली

काही अभ्यासकांच्या मते कामरगाव हे अंताजी माणकेश्वर यांनी वसविले. परंतु, ते मत चुकीचे ठरते. कारण कामरगावचा उल्लेख असलेले हे शिलालेख त्यांच्या जन्माच्या अगोदरचे आहेत. साधारणपणे २० फूट खोल विहिरीत असलेल्या या शिलालेखाचा छाप घेणे एक अवघड गोष्ट होती.

विहिरीला पाणी असल्याने शिलालेख फक्त उन्हाळ्ळ्याच्या दिवसांत दिसतो. मी मागच्या वर्षी पाणी कमी झाल्यानंतर कॅमेऱ्याचा वापर करून फोटो मिळविला. शिलालेख वाचन करण्याकामी कृष्णा गुडदे यांचे सहकार्य लाभले असल्याचं इतिहास संशोधक सतीश सोनवणे सांगतात.