Ahmednagar News : जिल्ह्यातील पाथर्डी आगाराच्या पाथर्डी-मुंबई या बसचा पुण्याजवळ अपघात होऊन चालक व आठ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि. १) रात्री एक वाजता घडली. चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाहक संभाजी जायभाय यांच्यासह सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत.
ग्रामीण भागाची जीवनदाईनी असलेली लालपरी दिवसेंदिवस खिळखिळी होत चालली आहे. ७६ वर्ष पार केलेल्या एसटीच्या ताफ्यात सध्या अनेक नवीन बस दाखल होत आहेत, मात्र तरीदेखील आद्यपही अनेक कालबाह्य झालेल्या परंतु त्या बस आजही रस्त्यावर धावत असल्याच्या आपण पाहतो.
या एसटी बसचा अनेकदा तांत्रिक बिघाड होतो. मात्र एसटीचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत या बसचा तसाच वापर सुरु आहे. पाथर्डी आगारातून दररोज रात्री साडेआठ वाजता मुंबईसाठी रातराणी बस निघते. शनिवारी (दि.१) रात्री चालक सतीश वारे पाथडी – मुंबई बस क्रमांक एमएच १४, बीटी ३०९०) बस घेऊन नगरहून पुण्यामार्गे मुंबईकडे जात होती.
ही बस पुणे जिल्ह्यातील पेरणे फाट्यानजिक आली असता बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने समोरच्या ट्रकवर बस धडकून रस्ता दुभाजकावर आदळली. त्यामध्ये एसटी बसचे मोठे नुकसान झाले. चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाहक संभाजी जायभाय यांच्यासह सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत.
पाथर्डी आगारातील सर्वच बसेस रस्त्यावर धावताना कधी आणि केव्हा कुठेही बंद पडेल, याचा भरवसा नाही. रस्त्यावर बस बंद पडणे हे नित्याचे झाले आहे. अशा बसगाड्या रस्त्यावर धावणे योग्य नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. लांबपल्ल्यांसाठी लागणाऱ्या चांगल्या गाड्या पाथर्डी आगाराकडे नसल्याने सध्या धावणाऱ्या गाड्या कधी वेळेवर पोहोचत नाही.
अनेक बसगाड्यांची किलोमीटर क्षमता संपले असून देखभाल दुरुस्तीसाठी वेळ सुद्धा मिळत नाही. वेळ मिळाला, तर गाड्यांचे सुट्टे भाग वेळेवर मिळत नाही. अशा खराब बसगाड्या चालवणे पाथर्डी आगारातील चालकांची कसरत म्हणावी लागेल. मात्र, ही कसरत आता चालक वाहक आणि प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने याबाबत तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे.