छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्लील गाण्यावर नाचणाऱ्या “त्यांनी” नाक रगडून माफी मागावी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

“ज्यांच्या” मनपा सत्ताकाळात धर्मवीर संभाजी महाराज यांचा प्रोफेसर कॉलनी चौक येथे शिवप्रेमींनी बसवलेला पुतळा भर चौकातून काढून नेण्यात आला, “त्यांनीच” छत्रपतींचे नाव घेत दिशाभूल करुन शिवप्रेमींची गर्दी जमवत तमाम शिवप्रेमींची फसवणूक केली आहे. ही फसवणूक खपवून घेतली जाणार नाही. महाराजांसमोर चुम्मा, चुम्मा सारख्या अश्लील गाण्यावर नाच करणाऱ्या आणि तमाम शिवप्रेमींची फसवणूक करणाऱ्या शहराच्या आमदारानी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक रगडून माफी मागावी, अशी मागणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.

काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काळे बोलत होते. पत्रकार परिषद सुरु करण्यापूर्वी काँग्रेसच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या वेळी काँग्रेसने राष्ट्रवादीचे शहराचे आ. संग्राम जगताप हे अश्लील गाण्यावर कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून नाच करीत असल्याचा व्हिडिओच पत्रकार परिषदेमध्ये लाईव्ह वाजवला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.

महाराजांशी संबंधीत प्रत्येक सोहळा आयोजनाच शिवप्रेमी म्हणुन आम्ही मनापासून स्वागतच करतो. माञ यापूर्वीच लोकार्पण झालेल्या पुतळ्याचे पुन्हा दुसऱ्यांदा लोकार्पण करत असल्याचे नाटक करून शिवप्रेमींची दिशाभूल करून गलिच्छ राजकारण करण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेसने शहराच्या आमदारांनी शिवप्रेमींची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबद्दल आमदारांनी शिवप्रेमींची माफी मागण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

“त्यांना” माहीत होते की त्यांच्या नावाने गर्दी जमा होणार नाही. म्हणूनच त्यांनी शिवप्रेमींची दिशाभूल करून आपला राजकीय अजेंडा राबविला आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे उपस्थित केले. दरम्यान सावेडीतील धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे “खरेखुरे लोकार्पण” पार पाडण्यात आमदारांनी केवळ राजकारण करण्यासाठी पडद्याआडून आडवा घातलेला पाय तात्काळ काढून घ्यावा. अन्यथा धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा लवकर आणि राजकारण विरहित व्हावा यासाठी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा किरण काळे यांनी दिला आहे.

महाराजांच्या समोर काल पोवाडे लावण्या ऐवजी “चुम्मा, चुम्मा” सारखी किळसवाणी अश्लील गाणी वाजविण्यात आली. या गाण्यावर स्वतः आमदार कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून नाचत होते. तसा व्हिडिओच काँग्रेसने समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे. राजकीय पोळी भाजणाऱ्या आमदारांना याची थोडी तरी लाज वाटायला हवी होती, असे म्हणत काँग्रेसने आमदारांच्या या कृतीला विकृत कृत्य म्हणत तीव्र निषेध केला आहे.

काँग्रेसने म्हटले आहे की, जुन्या माळीवाडा बस स्थानकाशेजारी अनेक वर्षांपुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा यापुर्वीच उभारण्यात आलेला आहे. शहरातील शिवप्रेमी तसेच विविध संघटना, पक्ष हे विविध कार्यक्रमानिमित्त श्रद्धेय महाराजांच्या पुतळ्याला वेळोवेळी अभिवादन करत असताता.

वेळोवेळी महापुरुषांच्या पुतळ्यांची रंगरंगोटी ही महापालिकेच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते. हा रुटीनचा भाग आहे. माञ शहरात असा संदेश निर्माण करण्यात आला होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडणार असून हा सोहळा पक्षविरहित आहे. त्यामुळे जुना पुतळा हटवून नूतन भव्यदिव्य पुतळा बसविण्यात येणार असून त्याचे लोकार्पण होणार असल्याची कुजबुज आणि उत्सुकता शिवप्रेमींना होती.

मात्र दिशाभुल करत शिवप्रेमींची फसवणूक करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पुर्वी पासूनच विराजमान आहे. त्याचे यापूर्वीच लोकार्पण झालेले आहे. लोकार्पण झालेल्या पुतळ्याचे लोकार्पण आमदारांनी पुन्हा दुसऱ्यांदा कसे काय केले ?

यांनी सावेडीतील धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण आपली सत्ता असून देखील गेल्या अनेक वर्षांपासून होऊ दिले नाही. आमदार म्हणून शहराच्या विकासाची यांनी कधी जबाबदारी तर पार पाडली नाहीच. पण आता महापुरुषांच्या आणि धर्माच्या नावावर यांनी गलिच्छ राजकारण शहरात सुरू करत शिवप्रेमींच्या भावनांशी खेळण्याचा सुरु केलेला उद्योग त्वरित थांबवावा. नाही तर काँग्रेसच्या वतीने यांचा खरपूस समाचार घेण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या ठिकाणी महाराजांच्या नावाचा जयघोष सुरू असताना आमदारांच्या नावाने देखील घोषणा देण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला. महाराजांच्या जयघोषा समोर अन्य कोणाचाही जयघोष शिवप्रेमी कदापि खपवून घेणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आमदार हे केव्हा मोठे झाले ? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसने म्हटले आहे की, महाराजांपेक्षा कोणीही मोठे असू शकत नाही. त्यामुळे छत्रपतींच्या नावाच्या जयघोषा बरोबर राजकीय पोळी भाजून आमदारांच्या नावाचा जयघोष शिवप्रेमींनी खपवून न घेता त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे कुण्या एका विशिष्ट वर्गाचे राजे नव्हते. तर सर्वधर्मीयांचे राजे होते. त्यांच्या मावळ्यांमध्ये अठरापगड जातींच्या मावळ्यांचा समावेश होता. त्यामुळे श्रद्धेय महाराजांना संकुचित विचारसरणीतून जाती-धर्मात विभागण्याचे काम त्यांनी करू नये, असे काँग्रेसने म्हटले आहे.

दरम्यान राजकीय वळण देत आमदारांकडून हायजॅक करण्यात आलेल्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी किरण काळे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालत पुष्पवृष्टी करुन अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने यावेळी परिसर दणाणून गेला होता. यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🚨 अनावरण महाराजांच्या पुतळ्याचे होते की आमदारांचे ?
—————————————————
ज्यावेळी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण सुरू झाले त्यावेळी शिवप्रेमींना महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी त्यांचे डोळे आतुर झाले होते. शिवप्रेमी डोळ्यात प्राण एकवटून हा क्षण डोळ्यात टिपण्यासाठी आतुर होते. मात्र महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला आमदार देखील त्यातून प्रकट झाले. विशेष म्हणजे महाराजांकडे तोंड करून उभे राहून त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याऐवजी आमदार तर गर्दीकडे तोंड करून उभे होते. त्यामुळे हे अनावरण महाराजांच्या पुतळ्याचे होते की आमदारांचे ? असा खरमरीत सवाल किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

पत्रकार परिषदेस ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेस अध्यक्ष अनंतराव गारदे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विशाल घोलप, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, रानीताई पंडीत, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला आदी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24