Ahmednagar News : ‘प्रवाशांच्या सेवेकरिता’ असे ब्रीदवाक्य घेऊन घावणाऱ्या एसटीने ७६ वर्ष पूर्ण केले आहेत. एसटीचा प्रवास स्वस्त, सोयीचा व सुरक्षित असल्याने सर्वसामान्य नागरिक एसटीच्या प्रवासाला पसंती देतात.सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवाशी दळणवळण सेवा देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाची बस करीत आहेत.
७६ वर्षांपासून ते आजही ऊनवारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक अडीअडचणी, अडथळे, आर्थिक संकटावर मात करीत डोंगरदऱ्यातील वाड्या वस्त्यांपासून आदिवासी पाड्यापर्यंत एसटी आपली सेवा देत आहे. मात्र ‘प्रवाशांच्या सेवेकरिता’ असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटीने प्रवाशांना मात्र आर्थिक भुर्दंड देण्याचा निर्णय घेतला आहे.
खाजगी हॉटेल्स व ढाब्यांवर एसटीला थांबा दिल्याने प्रवाशांना चढ्या दाराने खाद्यपदार्थ विकत घ्यायला लागत आहेत. त्यामुळे त्यांच्या खिशाला फटका बसत आहे, तर दुसरीकडे एसटी स्थानकांमध्ये भाड्याने दिलेल्या स्टॉल व कॅन्टीन ओस पडल्याने येथील व्यवसाय शेवटची घटका मोजत आहे.
परंतु एसटी महामंडळाने बहुतांशी खासगी हॉटेल्स व ढाब्यांवर एसटी थांबवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अल्पोपाहार केंद्रांवर गाडी थांबत नसल्याने ही केंद्र आता ओस पडू लागली आहेत.
खाजगी हॉटेल व ढाबा व्यावसायिकांकडून एसटीचे चालक व वाहक यांच्या मोफत जेवणाची व्यवस्था केली जाते. त्यामुळे ज्या एसटी गाड्यांना परवानगी नाही, अशा गाड्याही येथे थांबवल्या जातात. एरव्ही प्रवाशांना लघुशंकेसाठी गाडी न थांबवणारे एसटीचे चालक-वाहक या हॉटेल्स ढाब्यांवर किमान २० ते २५ मिनिटे गाडी थांबवतात. त्यामुळे इच्छा नसतानाही प्रवाशांना येथे चढ्या दराने खाद्यपदार्थ विकत घ्यावे लागतात.
त्यामुळे अशा हॉटेल्स, ढाब्यांवर एसटी बसेस थांबवू नयेत, अशी मागणी प्रवासी करत आहेत. तर दुसरीकडे एसटी स्थानकांमध्ये भाड्याने दिलेल्या स्टॉल व कॅन्टीन ओस पडल्याने येथील व्यवसाय शेवटची घटका मोजत आहे.