Ahmednagar News : ५० गावांत पावसाळ्यात पाणी टंचाई..!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :-  पाणीपुरवठा विभागाच्या उदासीनतेमुळे जायकवाडी पाणी योजनेच्या विहीर व जलशुद्धीकरण केंद्रात साचलेला गाळ काढण्यास अद्यापही यश आले नाही. यामुळे पाथर्डी-शेवगाव सह ५० गावांत भरपावसाळ्यात गेल्या दहा दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत शहराला टँकरने पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी आहे. दहा दिवसांपूर्वी रात्री अतिवृष्टी होऊन सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली याचा फटका दहिफळ येथील जॅकवेल व शेवगावच्या खंडोबा माळ येथील जलशुद्धीकरण केंद्राला बसला.

त्यात पूर्णपणे गाळ साचला. दोन्ही शहरासह नळ पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असलेल्या गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या तालुक्यात जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग मंदगतीने काम करत आहे. दोन्ही तालुक्यातील सर्वपक्षीय पुढारी, पालिकांचे पदाधिकारी त्रयस्थ भावनेने बंद पाणीपुरवठ्याच्या विषयाकडे पाहत आहेत.

रस्त्यावरील घाण, कचरा, चिखल तुडवत महिलांना हात पंपावरून, सार्वजनिक विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. पावसाळ्यात पाणी विकणारे कमी झाल्याने त्यांना शोधून विकत पाणी घेऊनच पाण्याची गरज भागवावी लागते. अनेकांना आगामी निवडणुकीचे वेध लागले आहे.

या प्रश्नाला सर्वाधिक अग्रक्रम देऊन दोन-तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करणे प्रशासनाला शक्य होते. इच्छाशक्तीचा अभाव व तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे संथ गतीने गाळ उपसला जात आहे. दहीफळ येथील जॅकवेल व खंडोबा माळ येथील जलशुद्धीकरण केंद्र गाळाने भरले असून उपलब्ध यंत्रसामग्रीवर गाळ उपसण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे.

Ahmednagarlive24 Office