Ahmednagar Politics :- श्रीरामपूर समन्यायी पाणी वाटप कायदा करण्याचे पाप ज्यांनी केले. तेच सदर कायदा रद्द करावा, अशी मागणी करीत आहेत. हा कायदा ज्यांनी केला त्या मंत्री राधाकृष्ण विखे व तत्कालीन मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी सदरचा कायदा रद्द करुन दाखवावा. असे केल्यास आपण त्यांच्याकडे आयुष्यभर पाणी भरु, असे प्रतिपादन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी केले.
येथील अशोक कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मुरकुटे यांच्या हस्ते व भारत राष्ट्र समिती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली काल मंगळवारी पार पडला. याप्रसंगी मुरकुटे बोलत होते.
या कार्यक्रमास गंगापूरचे माजी आमदार आण्णासाहेब माने, हेमंत ओगले, कामगार नेते अविनाश आपटे, दिलीप नागरे, संजय छल्लारे, तेजस बोरावके, राजन चुग, मुख्तार शहा, शेखर दुबैय्या, पुरुषोत्तम झंवर, बाळासाहेब खाबीया, प्रविण गुलाटी आदी उपस्थित होते.
यावेळी मुरकुटे म्हणाले की, २००३ साली समन्यायी पाणी वाटपाचे विधेयक विधानसभेत तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजित पवार यांनी तर विधानपरिषदेत तत्कालीन राज्यमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी मांडले. सदर कायदा सन २००५ साली संमत झाला. मधले दोन वर्ष यासंदर्भात तत्कालीन आमदारांनी कोणताही विरोध केला नाही.
त्यामुळे हे सर्वजण समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या पापाचे धनी आहेत. ज्यांनी पाप केले तेच आता हा कायदा रद्द करावा, अशी मागणी करीत आहेत. आपण आमदार असतो तर हा कायदा होऊ दिला नसता, असे मुरकुटे म्हणाले.
यावेळी माजी आ. माने यांनी मनोगत व्यक्त केले. साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ओगले, कामगार नेते अविनाश आपटे, अशोक थोरे यांची भाषणे झाली.
प्रारंभी संचालक प्रफुल्ल दांगट व योगिता दांगट तसेच केनयार्ड सुपरवायजर भिकचंद मुठे व मिराबाई मुठे यांच्या हस्ते गव्हाण पुजन करण्यात आले. संचालक हिम्मतराव धुमाळ यांनी मांडलेल्या अध्यक्षीय सुचनेस संचालक ज्ञानेश्वर काळे यांनी अनुमोदन दिले. संचालक बाबासाहेब आदिक यांनी आभार मानले. याप्रसंगी सभासद, शेतकरी, महिला, हितचिंतक, व्यापारी, अधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्तेच्या जोरावर मंत्री विखे व आ. थोरात हे इतर कारखान्यांना त्रास देतात. इतरांच्या कारखान्याचे वजनकाटे तपासले जातात. पण मंत्री विखे व आ. थोरात यांच्या कारखान्याचे वजनकाटे कोण तपासणार, असा सवाल मा. आमदार मुरकुटे यांनी उपस्थित केला आहे.