अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- नगर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने यंदा पाण्याचे संकट उद््भवण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा १२० मिलिमीटर कमी पाऊस झाला. आतापर्यंत ३२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
दरम्यान, आता जिल्ह्याची मदार ही परतीच्या पावसावर असणार आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला होता. जूनच्या अखेरीस देखील पावसाने हजेरी लावली होती.
मात्र जुलै महिना पूर्णपणे कोरडा गेला होता. ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने पुन्हा हजेरी लावली होती. मात्र, चार दिवसापासून पुन्हा पावसाने पाठ फिरवली. विहिरी छोटे-मोठे तलाव देखील पावसामुळे भरलेले नाहीत. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
नगर जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ४४८ मिलिमीटर आहे. यंदा मात्र १ जून ते २७ ऑगस्ट अखेरपर्यंत ३२८ मिलिमीटर पाऊस झाला. सरासरीपेक्षा १२० मिलिमीटर कमी पावसाची नोंद यंदा नगर जिल्ह्यात झाली.
त्यामुळे आता परतीच्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली. जिल्ह्यात आतापर्यंत नगर ३०९, पारनेर २४६, श्रीगोंदे १०१, कर्जत २७९, जामखेड ३३३, शेवगाव ३६७, पाथर्डी ३७०, नेवासे २९७, राहुरी ३२७, संगमनेर २६०, अकोले ५३२, कोपरगाव ३६८, श्रीरामपूर ३६३ व राहाता तालुका ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
भंडारदरा, गोदावरी, भीमा या नद्यांतून धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात मंदावला असून, दोन आठवड्यापूर्वी सर्वच धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत होता.
शुक्रवारी सकाळी भंडारदरा धरणातून ८३० क्यूसेस, नांदूर मध्यमेश्वर धरणातून ६०६ क्यूसेस, तर भीमा नदीतून २ हजार ४७० क्युसेसने पाणी सोडण्यात आले. आता जिल्ह्याला पावसाची गरज असून शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागलेल्या आहेत.