अजिंक्य गायकवाडच्या वडिलांनी सांगितल ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :-  घरात आलेल्या टीव्ही केबलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने त्याचा धक्का बसून अजिंक्य सुरेश गायकवाड (वय २८) या खेळाडूचा मृत्यू झाला. टीव्ही व्यवस्थित दिसत नसल्याने अजिंक्य केबल काढून परत जोडण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला विजेचा धक्का बसला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.

अहमदनगरचा युवा शरीरसौष्ठवपटू अजिंक्य गायकवाड याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. घरात असलेल्या टीव्ही केबलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने शॉक बसून अजिंक्यचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली. ग्रिलला चारही बोटं चिकटल्यामुळे तो ऑन द स्पॉट गेल्याचं वडिलांनी सांगितलं.

त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता अजिंक्य आईसोबत सोफ्यावर बोलत बसला होता. हॉलमध्ये चुर-चुर आवाज येत होता. केबल हायटेन्शन वायर घरामध्ये आली होती. खिडकीला ती लटकत होती. आमच्याही लक्षात नाही, की तिथे शॉर्ट उतरेल. आमच्या घरामध्ये डिश होती, त्यामुळे त्या केबलचा मी कधीच उपयोग केलेला नाही. पाऊस-वाऱ्यामुळे खिडकीला लटकताना वायरचं स्पार्किंग व्हायचं.

म्हणून अजिंक्य पाहायला गेला. तिथे टीव्हीचे बोर्ड होते. चुकून त्याचा ग्रिलला हात लागला आणि चारही बोटं चिकटली. जोराचा धक्का बसला आणि ऑन द स्पॉट गेला.” अशी माहिती अजिंक्यच्या वडिलांनी दिली. “यामध्ये पूर्णपणे एमएसईबी आणि केबल चालकाची चूक आहे.

माझा मुलगा गेला, तो काही परत येणार नाही. हरहुन्नरी मुलगा गेला. कोणत्याही मात्या-पित्यावर ही वेळ येऊ नये, शासनाने हे प्रकार बंद केले पाहिजेत. माझं सरकार असून माझ्यावर ही वेळ आली, याचंच मला दुःख वाटतं” अशा भावना अजिंक्यच्या वडिलांनी व्यक्त केल्या आहेत.

अजिंक्य गायकवाडच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजिंक्य वेगवेगळ्या खेळात निपुण होता. 2019 मध्ये त्याने मिस्टर वर्ल्ड स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याच्या मृत्यूमुळे गायकवाड परिवारासह अजिंक्यचे मित्र आणि फॉलोवर्स यांना मोठा धक्का बसला आहे.

महावितरण आणि केबल चालकांच्या हलगर्जीपणामुळे अजिंक्यचा मृत्यू झाला असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. 11 के व्ही ओव्हर हेड वायरवरून आलेल्या केबल टीव्ही वायरमधून हा वीजेचा करंट आला. हा करंट खूप मोठा होता त्यामुळे शॉक बसल्याने तो वायरला चिकटून राहिला.

केबल चालकांच्या हलगर्जीपणामुळे अजिंक्यचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

Ahmednagarlive24 Office