अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- परिवहन महामंडळातील एस.टी. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
त्यानुसार आज तातडीने निधी वितरीत करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो एस.टी. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना संकट काळात एस.टी.कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा बजावली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार ठामपणे उभे आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या परिवहन महामंडळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत झाले पाहिजे, अशी या सरकारची भूमीका आहे.
कोरोना संकटकाळात टाळेबंदीची परिस्थिती निर्माण झाल्याने एस.टी.च्या वाहतुकीवर परिणाम झाला. प्रवासी संख्या कमी झाली. त्यामुळे परिवहन महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.
परिणामी पगारासाठी निधीची कमतरता निर्माण झाली. या कठीण परिस्थितीचा विचार करता परिवहन महामंडळाला उपमुख्यमंत्र्यांनी 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश दिले व त्याची तात्काळ अमलबजावणी झाली. या निर्णयामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.