Alert : कोरोना काळापासून जवळपास सर्व कामे ही ऑनलाईन पूर्ण होत आहेत. काहीजण तर त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा लॅपटॉप किंवा मोबाईलवरच व्यतीत करतात. सध्या डिजिटायझेशन वाढले आहे त्यामुळे आता तुम्हाला कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी बँकेत जाण्याची गरज राहिली नाही.
परंतु, यामुळे सध्या ऑनलाईन आर्थिक फसवणुक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकजण मोफत चित्रपट डाऊनलोड करतात. परंतु, त्यांची हीच सवय त्यांना आर्थिक अडचणीत आणू शकते. कारण फसवणूक करणारे मोफत चित्रपटाच्या नादात बँक खाते रिकामे करत आहेत.
विसरू नका या गोष्टी
अज्ञात आणि बनावट लिंक उघडू नका
विनामूल्य चित्रपट डाउनलोड करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक्सना भेट देतात. खरं तर त्यांना या लिंक्स एकतर त्यांच्या मित्रांमार्फत मिळतात किंवा ते स्वतःच शोधतात. परंतु, हे लक्षात ठेवा की जर तुम्ही अशा अज्ञात आणि बनावट लिंक्सवर क्लिक केले की तुमचा मोबाइल किंवा संगणक हॅक होऊ शकतो आणि नंतर फसवणूक करणारे तुम्हाला कंगाल बनवू शकतात.
त्यामुळे तुम्ही चुकूनही कोणत्याही अज्ञात लिंकवरून चित्रपट डाउनलोड करू नका. त्याच वेळी, जर तुम्हाला संदेश किंवा सोशल मीडियाद्वारे कोणतीही लिंक मिळाली असल्यास जी तुम्हाला विनामूल्य चित्रपट डाउनलोड करून देण्याचा दावा करते अशा लिंकवर कधीही क्लिक करू नका कारण ती बनावट असण्याची शक्यता असते.
परवानगी देऊ नका
जेव्हा तुम्ही अशा अनेक प्रकारच्या वेबसाइट्सला भेट देता तेव्हा इथल्या अनेक वेबसाइट्स तुमच्याकडून परवानगी मागतात. उदाहरणार्थ जसे की- तुमचे स्थान, कॅमेरा, स्टोरेज इ. त्यामुळे लक्ष देणे आवश्यक आहे की कोणत्याही वेबसाइटला अशी परवानगी देणे टाळा कारण त्याची गरज नाही. जर तुम्ही असे केले तर ती तुमचा डेटा चोरू शकते किंवा तुमचे नुकसान करू शकते.
करू नका APK अॅप इन्स्टॉल
सध्या अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्या वापरकर्त्यांना चित्रपटांच्या लिंकसाठी APK अॅप इन्स्टॉल करा असे सांगतात. परंतु, हे लक्षात ठेवा की चुकूनही असे अॅप इन्स्टॉल करू नका, कारण हे अॅप तुमचा सर्व डेटा चोरू शकते.