अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-येत्या एप्रिलपासून परीक्षा पूर्व तयारीला सुरुवात होणार आहे अशा वेळेस परीक्षा घेणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्यांचा सहवास लाभणार आहे,
या परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव रोखणारी लसीकरण मोहीम शिक्षकांना वयाची अट न टाकता तात्काळ प्राधान्याने शिक्षकांना द्यावी.
अशी मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. शिक्षकांना घरोघरी फिरून अशा बिकट परिस्थितीत वेगवेगळी सर्वेक्षणे करावी लागतात.
एकंदर कोविड योद्धा म्हणून ही सारी कामे शिक्षक विनातक्रार पार पडतात; परंतु यातून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे.
सध्या फक्त ४५ वर्षे वयापुढील व्यक्तींनाच कोविड लस दिली जात असल्याने अनेक शिक्षक या अटीत समाविष्ट होऊ शकत नाहीत.
त्यामुळे आवश्यकता असूनही शिक्षकांना सुरक्षतेसाठी लस घेता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करून
जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे प्राधान्याने सरसकट कोविड लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी शिक्षकांच्या वतीने करण्यात आली आहे.