अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News :-दोन वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्य शिक्षण मंडळाकडून लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. बारावीची परीक्षा सुरू असताना आता दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे.
१६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून, मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा होणार आहे.
यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य मंडळाने प्रत्यक्ष परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू झाली आहे, तर आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे.
विद्यार्थी करोना बाधित झाल्याने किंवा अन्य वैद्यकीय, अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, लेखी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ न शकल्यास ५ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत परीक्षा घेतली जाईल. तर पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्याचे राज्य मंडळाचे नियोजन आहे.
परीक्षेसाठी प्रशासकीय तयारी
७० ते १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी ३० मिनिटे जादा वेळ
४० ते ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी १५ मिनिटे जादा वेळ
परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके, महिलांची विशेष पथके स्थापन,
परीक्षा केंद्रांचे चित्रीकरण
विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान तणावाबाबत मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्ती
विद्यार्थ्यांनी तासभर आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. जेणेकरून परीक्षा केंद्रांवर अडचण होणार नाही. विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता, कोणत्याही गैरप्रकाराला बळी न पडता परीक्षेला सामोरे जावे.