घर बांधकामाच्या परवानगीसाठी सरपंचाची अडकाठी पैश्याची मागणी केली जात असल्याचा आरोप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-  वारूळवाडी (ता. नगर) ग्रामपंचायत हद्दीत घेतलेल्या जागेवर घराचे बांधकाम करण्याच्या परवानगीसाठी सरपंच अडवणूक करीत असल्याचा आरोप करुन जागा मालक असलेल्या महिलेस बांधकामास परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने पंचायत समितीचे उपसभापती डॉ. दिलीप पवार व माजी सभापती रामदास भोर यांना देण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे, शहर अध्यक्ष शहानवाज शेख, नाजनीन अहेसान शेख, अहेसान शेख आदी उपस्थित होते. उपसभापती पवार व माजी सभापती भोर यांनी सदर महिलेच्या घराच्या बांधकामासाठी रितसर परवानगी देण्यास अडचण येणार नसून,

अशा प्रकारे नगर तालुक्यात बांधकामासाठी अडवणुक होत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. जागा मालक नाजनीन अहेसान शेख यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,

वारूळवाडी येथील पाच गुंठ्याचा प्लॉट सागर कर्डिले व इतर यांच्याकडून खरेदी घेतलेली आहे. सदर प्लॉटवर बांधकाम करण्यापूर्वी मान्यता घेण्यासाठी गेले असता तेथील सरपंच व ग्रामसेवक यांनी बिनधास्त बांधकाम करावे अशी तोंडी परवानगी दिली.

आंम्ही तुम्हाला लवकरच लेखी परवानगी देऊ असे कबूल केले. त्यांच्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवून त्यानुसार सदर प्लॉटमध्ये बांधकाम चालू केले. परंतु बांधकाम पाया लेव्हल पर्यंत आले असता गावातील ग्रामपंचायततर्फे तुम्ही अवैधकाम करत असल्याचे सांगून घराचे बांधकाम थांबविण्यात आले आहे.

नाजनीन शेख यांनी रितसर बांधकाम परवानगी मिळण्यासाठी वारूळवाडी ग्रामसेवक यांच्याकडे लेखी मागणी केलेली आहे. ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांनी जाणून-बुजून बांधकाम परवानगी देत नाही.

तर सदर बांधकाम करण्यासाठी इतर मध्यस्थी घालून लाखो रुपयांची मागणी केली जात आहे व पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सदर महिलेच्या घराच्या बांधकामास वारूळवाडी ग्रामपंचायतीने रितसर परवानगी देण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समितीच्या बीडीओ यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24