अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- वनकुटे (ता. पारनेर) येथील ग्रामसेवकाने पदाचा गैरवापर करून जागेची नोंद दुसर्याच्या नावाने लावून अन्याय केला असल्याचा आरोप स्थानिक महिला हौसाबाई साळवे यांनी केला आहे.
प्रशासकीय अधिकारी यांनी याबाबत कोणतीही दखल न घेतल्यामुळ 12 जुलै रोजी नाशिक विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला असून, सदर प्रकरणी न्याय न मिळाल्यास कुटुंबीयांसह आत्महत्या करण्याचे त्यांनी म्हंटले आहे.
हौसाबाई एकनाथ साळवे वनकुटे (ता. पारनेर) गावठाणात राहतात. त्यांचा मुलगा गणेश साळवे याची नाव व मिळकत क्रमांक 828 जागा असून, ती ग्रामपंचायतीने वापरण्यास दिली होती. तसेच त्या जागेची वेळोवेळी कर पावती साळवे कुटुंबीय भरत होते.
परंतु काही दिवसांनी ती मिळकत 872 परस्पर बबन सिताराम साळवे यांना देऊन ग्रामपंचायतीने अन्याय केला असल्याचे हौसाबाई यांनी निवेदनात म्हंटले आहे. सदर प्रकरणाचा पाठपुरावा वेळोवेळी प्रशासकीय अधिकारी वनकुटे ग्रामपंचायत, पंचायत समिती पारनेर, तहसील अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,
जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग, जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आला. न्याय मिळण्यासाठी उपोषण केले असता लिखित स्वरूपात उत्तर देऊन उपोषणापासून परावृत्त करण्यात आले.
परंतु त्यावर अजूनही कारवाई झालेली नाही. स्वातंत्र्य मिळूनही आमच्या समाजाला न्याय मिळत नाही. या जागेच्या वादामुळे जीवे मारण्याच्या धमक्या येत असून, प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याचे हौसाबाई यांनी स्पष्ट केले आहे.
सदर जागा पुन्हा नावावर करावी, जागेची फेरबदल प्रकरणी चौकशी करुन संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी नाशिक येथे विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले जाणार आहे. तरी देखील न्याय न मिळाल्यास सर्व कुटुंबीय जीवनयात्रा संपवणार असल्याचे त्यांनी निवेदनात नमुद केले आहे.