१ जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी द्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोविडच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः कहर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू केलेले आहेत.

यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत. यामुळे व्यावसायिकांच्या उत्पन्नाचा स्रोत गोठला गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

मात्र, आता लाट ओसरु लागली असून,१ जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कोपरगाव व्यापारी समितीने तहसीलदारांकडे केली आहे.

याबाबत इंसिडेंट कमांडर तथा तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शहरातील छोट्या-मोठ्या सर्व व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन काळात प्रशासनास नियम पाळून सहकार्य केले आहे.

परंतु संसाराचा गाडा ओढण्यासाठी हक्काचं साधन असलेला व्यवसाय बंद असल्याने अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच व्यवसाय करण्यासाठी घेतलेले कर्ज, हातउसने पैसे, कर भरणेही मुश्किल आहे.

यासाठी शासनाने गर्दी रोखण्यासाठी मनाई केलेल्या व्यवसायांतून काय साध्य केले असा सवाल करून, किमान दहा तास दुकाने खुली ठेवली तरच गर्दीवर नियंत्रण येईल.

यामध्येही एक दिवस जीवनावश्यक व दुसऱ्या दिवशी इतर वस्तूंचे दुकान सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावेत,

अशी मागणी कोपरगाव व्यापारी समितीचे शरद खरात, अकबर शेख, निसार शेख, अजय विघे, रवींद्र जगताप, अर्शद पठाण यांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24