अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- गेल्या पाऊणे दोन महिन्यांपासून शहरातील सलूनसह सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शहरातील रुग्ण संख्या कमी होत असून नियम अटींचे पालन करून सलूनसह सर्व दुकाने उघडण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी ओ बी सी बाराबलुतेदार महासंघाचे शहराध्यक्ष शामभाऊ औटी यांनी म न पा आयुक्त शंकर गोरे आणि जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदन पाठवून केली आहे.
कोरोनाची पहिली लाट ओसरली आणि शहरातील व्यवसाय धीम्या गतीने सुरु झाले होते. व्यावसायिकांची आर्थिक घडी बसण्या पूर्वीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पूर्ववत लॉकडाऊन आणि सर्व व्यवहार पुन्हा ठप्प झाल्याने छोट्या व्यावसायिकांचे हाल होताहेत.
सलूनसारख्या पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या सर्वच बाराबलुतेदारांना याचा मोठा आर्थिक फटका बसला असून हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना या काळात खरंतर शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी करून औटी निवेदनात पुढे म्हणतात
कि,गत वर्षी (ऑक्टॉबर – नोहेंबर २०२०) छोट्या व्यावसायिकांना दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य कर्ज रूपाने दिले होते त्याची नियमित कर्जफेड होण्या पूर्वीच कोरोनाची दुसरी लाट आली.आता या छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद ठेऊन कसे चालेल? असा सवाल उपस्थित केला.
या सर्व छोट्या व्यावसायिकांना पूर्वीची कर्ज फेड झाल्याबरोबर १५ ते २० हजारांचे कर्ज रूपाने अर्थसाहाय्य द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
म न पा ने पुढाकार घेऊन नियम , अटी लागू करून सलूनसह छोट्या व्यावसायिकाची दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी शामभाऊ औटी यांच्यासह ओ बी सी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माउलीमामा गायकवाड,महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष इंजि.
बाळासाहेब भुजबळ,ओबीसी १२बलुतेदार महासंघाचे जि.उपाध्यक्ष अनिल इवळे, युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष आर्यन गिरमे, नाभिक राज्य मीडिया प्रमुख अजय रंधवे, १२बलुतैदार महासंघाचे कार्याध्यक्ष रमेश बिडवे, ओ बी सी व्ही जे एन टी जनमोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ,
महिला शहर जिल्हाध्यक्षा अनुरिता झगडे ,महिला जिल्हाध्यक्षा मनीषा गुरव, नाभिक महिला जिल्हाध्यक्षा वनिता बिडवे, जिल्हा उपाध्यक्षा सुलभा सटाणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी,सदस्यांनी केली आहे.
शहरातील सलून सह सर्व छोट्या व्यावसायिकांच्या तीव्र भावनेचा विचार करावा अन्यथा नाईलाजाने आंदोलन करावे लागेल असा इशाराही औटी यांनी निवेदनात दिला आहे.