अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी CET परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेच्या गुणांवरच अकरावीचा प्रवेश निश्चित होणार आहे.
त्याआधी दहावीचा निकाल लागणं आवश्यक आहे. शिक्षकांना अंतर्गत मूल्यमापन करण्यास पुरेसा वेळ मिळावा आणि निकाल लवकर लागावा म्हणूनच सोमवारपासून मुंबई उपनगरांमधून विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र आता राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांचं विशेष पद्धतीनं मूल्यमापन करून दहावीचा निकाल लावण्यात येणार आहे.
हा निकाल लवकर लागावा आणि शाळेत येण्या जाण्यासाठी शिक्षकांना त्रास होऊ नये म्हणून आता राज्य परिवहन मंडळ शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आलं आहे. सोमवारपासून परिवहन मंडळाच्या विशेष बसेस धावणार आहेत.
सध्या शिक्षक, मुख्याध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांना शाळेत ये-जा करावी लागत आहे. मात्र कोरोनामुळे लोकल सेवा ठप्प आहे तसंच इतर वाहतुकीची संसाधनंही कमी आहेत.
त्यामुळे मुंबई उपनगरांमधून शाळेत जाण्या- येण्यासाठी शिक्षकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. हा त्रास शिक्षकांना होऊ नये यासाठीच राज्य परिवहन मंडळानं हे पाऊल उचललं आहे.