Entertainment News : बॉक्स ऑफिसवर सध्या अनेक चित्रपटांची रेलचेल आहे. परंतु येत्या ख्रिसमसला मात्र अनेक दिग्गज सिनेमांची टक्कर होणार आहे. एकीकडे शाहरुख खानचा डंकी आणि दुसरीकडे प्रभासचा सालार हे दोन्ही सिनेमे ख्रिसमसला येणार आहेत. यांत कांटे कि टक्कर होईल यात शंका नाही.
असे असतानाच आता हॉलिवूडचा सिनेमा डीसी फिल्म एक्वामॅन अँड द लॉस्ट किंगडमनेही त्यांच्यासोबत चित्रपटगृहांमध्ये धडकण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे. आता हा चित्रपट 21 डिसेंबरला भारतातील चित्रपटगृहांमध्येही प्रदर्शित होणार आहे. अशा स्थितीत आता या तिन्ही सिनेमांची टक्कर होईल. यात आता कोण चालेल व कुणाला जास्त याचा फटका बसेल हे पाहावे लागेल.
कुणीच मागे हटेना
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅक्वामॅन अँड द लॉस्ट किंगडम हा चित्रपट 22 डिसेंबरच्या एक आठवडा आधी किंवा आठवड्यानंतर भारतात प्रदर्शित होणार होता. पण प्रॉब्लेम असा होता की हा सिनेमा १५ डिसेंबरला रिलीज झाला असता तर तो उत्तर अमेरिकेच्या बाजारपेठेत येण्याआधीच पायरेटेड होऊ शकला असता.
२९ डिसेंबरला आल्यावर त्याचा रिव्ह्यू आधीच आलेला असेल. हा चित्रपट २२ डिसेंबरला अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे वॉर्नर ब्रदर्सने २१ डिसेंबरला भारतात लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अशीही खबर आहे की, डंकी आणि सालारच्या निर्मात्यांनी वॉर्नर ब्रदर्स यांना त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.
विनंती नाकारली
वॉर्नर ब्रदर्सने दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांची विनंती मान्य करण्यास नकार दिला. त्यांचा विश्वास आहे की त्यांच्या सिनेमात जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे. त्यांना डिंकी आणि सालारपासून धोका नाही. अॅक्वामॅन अँड द लॉस्ट किंगडम ही एक मोठी फ्रँचायझी आहे. त्याचा मुख्य अभिनेता जेसन मोमोआ देखील भारतात लोकप्रिय आहे. पहिला भाग अॅक्वामॅन (2018) ने 54.60 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. IMAX आणि 4DX स्क्रीनवर प्रेक्षक भारतीय चित्रपटांपेक्षा Aquaman च्या सिक्वेलकडे जास्त लक्ष देऊ शकतात. त्यामुळे डिंकी आणि सालार यांना तोटा सहन करावा लागू शकतो.