पडळकरांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या अमितने आता सांगितले असे काही…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरील हल्लाप्रकरणी संशयित आरोपी अमित सुरवसे व निलेश क्षीरसागर या दोघांना शनिवारी गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली व जोडभावी पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत, “मी कोणाच्याही सांगण्यावरून नव्हे तर माझ्या स्वत:च्या प्रसिध्दीसाठीच आमदार पडळकर यांच्या गाडीवर दगड टाकला’, असे अमितने पोलिसांना सांगितले.

तर निलेश म्हणाला, “मला काहीच माहिती नव्हते, अमित चल म्हणाला म्हणून मी त्याच्यासोबत गेलो होतो’. यासंदर्भात आणखी तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली आहे.

घोंगडी बैठकीसाठी ३० जून रोजी आमदार गोपीचंद पडळकर हे सोलापुरात आले होते. तत्पूर्वी, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती.

त्यावर नाराज होऊन अमितने दगडफेकीचा प्लॅन केला, असा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलिसांनी आता तपास सुरू केला.

दरम्यान, हल्ल्यानंतर दोघेही पसार झाले होते आमदार पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केल्याचा निषेध व्यक्‍त करीत त्यांच्या समर्थकांनी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली.

त्यामुळे त्या दोघांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. दोन दिवसांपासून जोडभावी पेठ पोलिस व गुन्हे शाखेचे पोलिस त्यांच्या मागावर होते. ते दोघेही बक्षीहिप्परगा येथील एका शेतातील झाडाखाली असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.

पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकातील शंकर मुळे, राजेश चव्हाण, विद्यासागर मोहिते, सुहास अर्जुन, सनी राठोड, राहुल गायकवाड,

विजयकुमार वाळके यांनी संशय येणार नाही, असा शेतकऱ्यांचा वेश धारण केला. सापळा रचून त्या दोघांना शिताफीने पकडले.

अहमदनगर लाईव्ह 24