नगरमधील आयटी पार्कच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये तू तू में में…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील आयटी पार्क हा राजकीय मुद्दा करून निवडणुकांमध्ये या मुद्द्याचा प्रभावी वापर देखील करण्यात आला. आता पुन्हा एकदा हाच मुद्दा उपस्थित झाला असून यामुळे काही राजकीय नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले आहे.

यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद विकोपाला गेला आहे. नगर शहरातील एमआयडीसी येथील आयटी पार्कच्या निमित्ताने काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यातील वादाला जाहीर तोंड फुटले.

जगताप यांना उघडे पाडण्याचा प्रयत्न करण्यासाठी काळे यांनी आयटी पार्कला भेट दिली. मात्र, त्यानंतर त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.

नंतर दोघांनी पत्रकार परिषदा घेऊन आपल्यावरील आरोप फेटाळत एकमेकांना आव्हान दिले. याप्रकरणावर आमदार संग्राम जगताप म्हणाले, अनेक अडचणींवर मात करीत नागापूर औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेला आयटीपार्क सुरू केला.

त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होत असून, आयटीपार्क बंद पाडण्याचा प्रयत्न काही व्यक्ती करीत आहेत. अशा पद्धतीने भीतीचे वातावरण केल्यास नवीन कंपन्या येणार नाहीत.

आयटी पार्क हे राजकीय व्यासपीठ नाही. ज्यांना कोणाला आयटीपार्कमध्ये नवीन कंपन्या आणायच्या आहेत, त्यांनी त्या जरुर आणाव्यात. तरुणांना रोजागार उपलब्ध करून द्यावा.

आयटी पार्कच्या इमारती शेजारचा भूखंडही आयटीसाठी राखीव आहे. तिथेही आयटी पार्क सुरू करणार असल्याचे जगताप म्हणाले. तसेच याप्रकरणावर किरण काळे म्हणाले, जगताप यांनी निवडणूक प्रचारात आयटी पार्क मध्ये कंपन्या आणू आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते.

ते खोटे असल्याचे दाखवून देण्यासाठी काळे यांनी गुरुवारी तेथे जाऊन पाहणी केली. मात्र, त्यानंतर त्यांना गुन्ह्याला सामोरे जावे लागले. यासंबंधी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आयटी पार्कमधील पाहणीचे चित्रिकरणच पत्रकारांना दाखविले.

ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडून आमच्यावर विनयभंग, शिवीगाळ, धक्काबुक्कीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांमार्फत खोटे गुन्हे दाखल करण्यापेक्षा शहराच्या विकासकामांकडे लक्ष द्यावे.