अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-देेशात अभुतपूर्व आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडे गोंधळ आणि चिंतेचं वातावरण आहे. बेड नाही, ऑक्सिजन नाही आणि लसदेखील नाही. सगळीकडे गोंधळच गोंधळ आहे.
या स्थितीवर चर्चा करण्यासाठी संसेदचं किमान दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं. जय हिंद!, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून केली आहे. देशात सध्या कोरोनाने कहर केला अाहे.
याचा फटका महाराष्ट्रासह अनेक राज्यांना बसला आहे. महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्यात आले अाहेत. दिल्लीसोबत इतर अनेक राज्यांनीही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये बेड्स, व्हेंटिलेटर तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. यासाठी अनेक राज्यांनी केंद्राकडे मदतही मागितली आहे. यावर खासदार राऊत यांनी या देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे.
तसंच दोन दिवसांचं अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. भारतात करोना रुग्णांचा संसर्ग दर हा गेल्या बारा दिवसांत दुप्पट झाला असून तो आता १६.६९ टक्के झाला आहे. भारतात २ लाख ६१ हजार ५०० नवीन रुग्ण सापडले आहेत.
रविवारी १५०१ मृत्यूंची नोंद झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १८ लाख १ हजार ३१६ असून हे प्रमाण गेल्या २४ तासांत संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या १२.१८ टक्के आहे.
महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक व केरळ या राज्यांत एकूण ६५.०२ टक्के उपचाराधीन रुग्ण आहेत. एकूण १ कोटी २८ लाख ९ हजार ६४३ रुग्ण बरे झाले आहेत. २४ तासांत बरे झालेल्यांची संख्या १ लाख ३८ हजार २४३ झाली आहे.
दहा राज्यांत एकूण मृत्यूंच्या ८२.९४ टक्के मृत्यू झाले असून ही संख्या १५०१ आहे. महाराष्ट्रात ४१९ बळी गेले असून दिल्लीत बळींची संख्या १६७ आहे.