अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- केडगाव परिसरातील पथदिव्यांची दुरुस्ती करण्यासाठी मनपा विद्युत विभागाने उपाय योजना करण्यात याव्या. बंद पथदिवे सुरू करावेत.
तसेच एलईडी पथदिवे लवकरात लवकर बसवण्यात यावे अन्यथा पूर्व सुचना न देता कोरोना नियमाचे पालन करित लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल, असा इशारा मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिला आहे.
निवेदनात कोतकर यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून केडगाव परिसरातील पथदिवे बंद असल्यामुळे अंधार पसरला आहे.
अंधाराचा फायदा घेवून चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. केडगाव, सोनेवाडी रोड वरील लोंढे मळा परिसरात शेतकरी राहतात. या परिसरातील दिवे बंद असल्यामुळे अंधाराचा फायदा घेवून चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे.
केडगावातून जाणाऱ्या पुणे महामार्गावरील पथदिवे बंद असल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मी स्थायी समितीचा सभापती असताना संपूर्ण शहरामध्ये एलईडी पथदिवे बसवण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
त्यावेळी एलईडी पथदिवे बसवण्यासाठी लोकशाही मार्गाने उपोषण केल्यानंतर मनपाच्या वतीने लेखी आश्वासन दिले होते की, लवकरात लवकर शहरात एलईडी पथदिवे बसवण्यात येतील परंतु आजपर्यत कोणतीही कार्यवाही झालेली नाही एलईडी पथदिवे बसवण्याची
निविदा प्रक्रिया न्यायालयात गेल्यामुळे किती दिवस लागतील हे सांगता येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेने संपूर्ण केडगाव परिसरात एलईडी पथदिवे बसवावेत, अन्यथा उपोषणाला बसू, असा इशारा माजी सभापती कोतकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.