अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- मागील काही दिवसांपासून देशासह राज्यभरात कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. शेवगाव तालुक्यातील वरुर बुद्रुक येथील कोरोनाची लागण झालेल्या एका ६२ वर्षीय वृद्धाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान,वृद्धाच्या मृत्यूनंतरही भगूर आरोग्य उप केंद्राचे कर्मचारी वरुरकडे फिरकले नसल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली.
त्याच्यासोबतच ग्रामसेवक, तलाठीदेखील नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे गावातील नागरिक कोरोनाच्या सावटाखाली आहेत. शेवगाव पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी डॉ.सुरेश पाटेकर यांनी दुपारी वरुरला भेट दिली.
स्थानिक पातळीवर समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.गजेंद्र खांबट, आशा स्वयंसेविका मीना उभेदळ व सुनीता गमे यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम सुरू केले.
दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाच्या कुटुंबातील सहा जणांची सोमवारी कोरोना टेस्ट केली जाणार आहे. ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. सतर्क राहावे व काळजी घ्यावी, असे आवाहन सरपंच गोपाळ खांबट यांनी केले.