अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यातच जिल्ह्यात लसीकरण मोहीम देखील मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात आली आहे.
यातच नगरमधील एका प्रतिष्ठित हॉस्पिटलचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मेडिकलमधून खरेदी केलेले रेमडेसीवीर इंजेक्शन एक्सपायर झालेले असताना ते रूग्णांना दिले जात आहे,
अशा स्वरुपाची तक्रार करणारी व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेली आहे.
या क्लिपमुळे रूग्णांचा गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेवून आनंदऋषीजी हॉस्पिटल प्रशासनाने तातडीने खुलासा करीत वस्तुस्थिती मांडली आहे.
कॅडिला झायडस ही कंपनी जागतिक स्तरावरील नामांकित कंपनी असून त्यांच्या इंजेक्शनचा पुरवठा संपूर्ण महाराष्ट्रात होतो.
या कंपनीने आपल्या रेमडेसीवीर इंजेक्शनचे दर कमी केल्यानंतर सरकारच्या परवानगीनेच नवीन एमआरपीचे स्टिकर लावले तसेच शासनानेच त्यांना एक्स्पायरी डेट सहा महिन्यांऐवजी 12 महिने करण्याची परवानगी दिली.
त्यानुसार कंपनीने नवीन एमआरपी व नवीन एक्स्पायरी डेटचे स्टिकर लावलेला माल संपूर्ण महाराष्ट्रात वितरित केला.
असे नवीन स्टिकर लावलेली इंजेक्शने डिस्ट्रीब्युटर मार्फत आनंदऋषीजी हॉस्पिटलला मिळाली.
तीच रूग्णांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे फक्त आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्येच असे स्टिकर लावलेली इंजेक्शन विक्रीसाठी आहेत,
असा कोणताही प्रकार नसून नगर तसेच राज्यातील इतरही हॉस्पिटलमध्ये अशीच इंजेक्शने विक्रीसाठी आहेत.
ही सगळी वस्तुस्थिती असताना कोणीतरी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करीत आनंदऋषीजी हॉस्पिटलची बदनामी करण्याच्या हेतूने सदर व्हिडिओ क्लिप तयार करून ती व्हायरल केली आहे.
पूर्ण माहिती न घेता असे बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल करणे चुकीचे असून अशा प्रवृत्तींवर प्रशासनाने कठोर कारवाई करायला हवी, अशी भूमिका हॉस्पिटल प्रशासनाने मांडली आहे.