अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या कासारसाई धरणाच्या पाण्यात मधोमध अडकले होते. तराफ्यावरुन मत्स्य व्यवसायाची पाहणी करायला गेले असताना तराफ्याचे इंजिन अचानक बंद पडले.
अखेर त्यांची दुसऱ्या बोटीत रवानगी केल्यानंतर सुटका झाली. कासारसाई धरणावर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गेले होते. तराफ्यावर बसून मत्स्य व्यवसायाची पाहणी करत होते.
यावेळी अचानक तराफ्याचे इंजिन बंद पडले. इंजिन सुरु करण्याचे चालकाने प्रयत्न केले, पण ते सुरु होईना. शेवटी जवळच असलेली बोट बोलावण्यात आली.
त्यानंतर अजित पवार दुसऱ्या बोटीत बसले आणि पुढचा प्रवास सुरु झाला. कासारसाई धरण पुण्याच्या मावळ तालुक्यात आहे. तिथे बऱ्यापैकी मत्स्यव्यवसाय सुरू आहे.
त्याचीच माहिती घेण्यासाठी पालकमंत्री अजित पवार सकाळी सात वाजताच पोहोचले होते. धरणाच्या मध्यभागी पिंजरा लावण्यात आलेला होता.
तिथे जाण्यासाठी तराफा अथवा बोटीच्या साह्याने जायचे होते. संबंधित मालकांनी पवार यांना तराफ्यावर घेऊन जायचे नियोजन आखले होते. गाडीतून अजित पवार उतरताच त्यांना याची कल्पना देण्यात आली.
तेव्हाच तराफ्यावर गरजेपेक्षा जास्तीचे लोक घेऊ नका, अशी सूचना त्यांनी केली होती. पण उपस्थितांनी तरीही तराफ्यावर गर्दी केली आणि तराफ्यावरचे वजन जास्त झाल्यामुळे इंजिनवर ताण आला. त्यामुळे इंजिन बंद पडून तराफामध्येच अडकला होता.