अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- पत्नी व मुलांच्या भेटीसाठी त्याने वारंवार पाठपुरावा केला मात्र त्याला यश मिळाले नाही. शेवटी त्याने गेली ३ आठवड्यांपासून कारागृहातच अन्नत्याग केला. याबाबत सविस्तर माहिती अशी, एखाद्याच्या हातून गंभीर गुन्हा घडतो आणि त्यानंतर सारं आयुष्य बेचिराख होतं…संसारातून-मुलाबाळांपासुन दुर कैदेत रहावं लागतं.
शिक्षा भोगताना अनेक महिने वर्षे उलटून जातात…समाजाचा दृष्टिकोन बदलतो!पण शेवटी गुन्हा करणारा देखील एक माणूसच असतो. प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेणारी अशीच एक घटना आता समोर आली आहे. ज्यामध्ये एका आरोपी पित्याला आपल्या मुलांच्या भेटीसाठी आपल्या जीवाची बाजी लावावी लागली आहे.
कर्जत तालुक्यातील जावई असलेला काटकोर टाबर चव्हाण ह खुनाच्या गुन्ह्यात सध्या औरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृहात गेली चार वर्षांपासुन बंदिस्त आहे. आरोपीची मुले व पत्नी आता माहेरी राहत आहेत. परंतू काही महिन्यांपूर्वी याच गावातील एका इसमाशी आपल्या पत्नीने विवाह केला असल्याची माहिती त्याला समजली.
त्याने कर्जतच्या पोलीस ठाण्यामार्फत माहिती अधिकारात पत्नी व इतरांची माहिती मागवली.परंतु मिळालेली माहिती चुकीची आहे असे त्याचे मत होते. त्यानंतर आपल्या मुलांच्या भेटीसाठी त्याने वारंवार आपला संपर्क केला. मात्र त्याला योग्य माहिती मिळत नव्हती. मुलांच्या भेटीसाठी त्याने गेली ३ आठवड्यांपासून कारागृहातच अन्नत्याग केला.
अन्नत्यागामुळे त्याची प्रकृती खालावल्यामुळे औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.मात्र त्याने उपचार घेण्यास नकार दिल्याने अर्धवट उपचारावरच पुन्हा कारागृहात आणण्यात आले. कारागृहातील अधिकाऱ्यांनी विशेष म्हणजे चक्क तेथील अधीक्षकांनीही ‘तुझ्या मुलांची भेट घडवून देतो’ अशी त्याची समजुत काढली पण त्याने ऐकले नाही.
त्यात त्याची प्रकृती आणखीनच खालावली.त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी तात्काळ हलवण्यात आले. दरम्यान औरंगाबाद कारागृह कार्यालयाने कर्जतच्या पोलीस निरीक्षकांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी त्याच्या कंटुंबीयांची भेट घडवून आणली.