अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-वाघाचे केवळ नाव ऐकले तरी भल्या भल्यांची बोबडी वळते मात्र एका तरुणाने चक्क याच वाघाशी यशस्वी झुंज देत स्वताचे प्राण वाचवले.
ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे घडली. संजय भानुदास लोखंडे असे त्या वाघाशी झुंज देणाऱ्या तरुणाचे नाव आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, संजय लोखंडे हे रात्री आठ वाजेच्या दरम्यान आपली कामे आटोपुन मोटारसायकलवरुन बेलापूर येथुन देशमुख वस्तीजवळ असलेल्या आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते.
परंतु रस्त्यात दबा धरुन बसलेल्या वाघाने लोखंडे यांच्यावर अचानक झेप घेऊन त्यांना खाली पाडले. त्यांच्यात चांगलीच झटापट झाली. लोखंडे यांनी बचावासाठी वाघा अंगावर दगडे मारली.
मोठ मोठ्याने आवाज केला व कशीबशी स्वतःची सुटका करून घेत आरडाओरड करत तेथून सुमारे अर्धा किलोमीटर पळ काढत वस्तीचा आसरा घेतला. लोखंडे यांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक मदतीसाठी धाऊन आले.
त्यामुळे लोखंडे यांचे प्राण वाचले आणि त्यांचा पाठलाग करत असलेला वाघ पळून गेला दरम्यान त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याने त्यांच्यावर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र लस उपलब्ध नसल्याने लोखंडे यांना पुढील उपचारासाठी नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.