अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे शहरातील संगमनेर खुर्द ते अमृतवाहिनी कॉलेजपर्यंतचा नाशिक-पुणे ९ किमी. च्या चौपदरी करणासाठी २४ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
यातून सुशोभीकरण होणार असल्याने शहराच्या वैभवात आणखी भर पडणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी दिली.तांबे म्हणाल्या, शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गवर मोठी वर्दळ असते.
शहरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून ९ किमी. चा विना टोल बायपास मंजूर करून घेतला. नंतर नाशिक-पुणे बायपास रस्त्याचे चौपदरीकरणाचे कामही पूर्ण झाले.
वाहतुक बायपासने वळूनही शहरातील वाहतूक कायम आहे. यासाठी मंत्री थोरात यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या चौपदरीकरण व सुशोभीकरण कामाला मंजुरी देत २४ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
संगमनेर खुर्द, दिल्ली नाका, बस स्थानक ते अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंतचा ९ किमी. चा रस्ता चौपदरीकरण व विद्युत रोषणाईसह मध्यभागी दुभाजक टाकले जाणार आहे. महामार्गावर महाविद्याल असल्याने विद्यार्थी व नागरिकांसाठी पादचारी मार्ग देखील बनवण्यात येणार आहे.
यामुळे शहराचे वैभव वाढणार असून रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.९ किलोमीटर लांबीचा चौपदरी मार्ग. २४.५६ कोटीचा निधी असून दुभाजक, स्ट्रीटलाईट आहेत.
रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्ग अशा संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिल्याबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.