अंगणवाडी सेविकांनी मोबाईल केले परत आता पुन्हा नोंद रजिस्टरवरच

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- अंगणवाडी सेविकांना शासनाच्या वतीने शालेय पोषण अभियान अंतर्गत शासकीय कामांसाठी मोबाईल देण्यात आले. मात्र, हे मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने अंगणवाडी सेविकांनी सामूहिकरीत्या मोबाईल वापस केले होते.

यामुळे आता दैनंदिन रेकॉर्ड आता पुन्हा एकदा रजिस्टरवर आले आहे. अंगणवाडीतील पोषण आहार व त्यासंबंधीची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी सरकारकडून अंगणवाडीसेविकांना मोबाइल देण्यात आले आहेत.

पोषण आहार स्थिती, कुटुंब व्यवस्थापन, दैनंदिन आहार, गृहभेट नियोजन, शिधावाटप नोंद, अंगणवाडी केंद्र व्यवस्थापन मासिक प्रगती अहवाल याबाबतची सर्व माहिती अंगणवाडीसेविकांना ऑनलाइन पद्धतीने बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे पाठविणे बंधनकारक आहे.

मात्र, त्यामध्ये विविध अडचणी येत असल्याने सेविकांनी मोबाइल परत केले. नगर जिल्ह्यात एकूण ५ हजार ५५५ अंगणवाडीसेविकांपैकी १,९३८ अंगणवाडीसेविकांनी मोबाइल परत केले आहेत. मोबाइल परत केल्याने ऑनलाइन पद्धतीने अहवाल पाठविणे बंद झाले आहे.

सध्या जिल्ह्यात पोषण माह अभियानाची व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. या अभियानांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, कार्यक्रमांची माहिती ऑनलाइनऐवजी आता ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी केंद्रातून बालविकास प्रकल्प स्तरावर पाठविण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा कामाचा ताण वाढला आहे.

Ahmednagarlive24 Office