अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- कोपरगाव आगारातील यांत्रिकी विभागाचे कर्मचारी ॲानड्युटी पत्ते खेळतानाचा एक व्हिडीओ तीन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.
आता याप्रकरणी आगारप्रमुखांनी चार कर्मचारी निलंबित केले. वरिष्ठांकडून कारवाई करण्यात आली मात्र या कारवाईमध्ये दुजाभाव झालेला दिसून येत आहे.
कारण पत्त्याच्या डावात सात ते आठ जण पत्ते खेळताना दिसत असूनही केवळ चौघांवरच कारवाई कशी, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी कि, शनिवारी (दि. १२ जून) रोजी कोपरगाव आगारातील वर्कशाॅपमध्ये यांत्रिकी विभागातील आठ ते दहा कर्मचाऱ्यांचा पत्त्यांचा डाव रंगला होता. त्याचदरम्यान धुळे जिल्ह्यातील शहादा आगाराची बस कोपरगाव आगारात दाखल झाली.
बसमध्ये हवा कमी असल्याने बस चालकाने वर्कशाॅपमध्ये जाऊन बसची हवा चेक करण्याची विनंती कर्मचाऱ्यांना केली. मात्र पत्ते खेळण्यात व्यस्त असलेले कोपरगाव आगारातील यांत्रिकी विभागाचे कर्मचाऱ्यांनी या चालक-वाहकाशी उद्धट वागले.
दरम्यान या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नगर विभागीय कार्यालयापासून मुंबईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला होता. दरम्यान, कोपरगावचे आगारप्रमुख अभिजित चौधरी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार १३ जून रोजी या प्रकरणी चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले.