अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या राज्याच्या शिखर बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वांना ‘क्लीन चीट’ देऊन फौजदारी कारवाईचे प्रकरण बंद करण्यासाठी दिलेल्या ‘क्लोजर रिपोर्ट’ला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही ‘प्रोटेस्ट पीटिशन’द्वारे मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.
यापूर्वी तक्रारदार आरटीआय कार्यकर्ते सुरिंदर मोहन अरोरा, सहकार क्षेत्रातील नेते शालिनीताई पाटील व माणिकराव जाधव आणि अहमदनगरमधील साखर कारखान्यातील सदस्य किसन कावड यांनीही ‘प्रोटेस्ट पीटिशन’ दाखल केल्या असून,
या सर्वांवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. इओडब्ल्यूने गतवर्षी ऑक्टोबरमध्ये न्यायालयात सी-समरी अहवाल (क्लोजर रिपोर्ट) दाखल करून या प्रकरणात कोणताही दखलपात्र गुन्हा घडला नसल्याचा निष्कर्ष नोंदवला होता.
हा अहवाल सर्व दोषींना वाचवण्यासाठीअसून निव्वळ धूळफेक करणारा असल्याने तो फेटाळण्यात यावा, अशा विनंतीच्या तीन ‘प्रोटेस्ट पीटिशन’ दाखल झाल्यानंतर आता अण्णा हजारेंनी देखील नुकतीच अशी याचिका दाखल केली आहे.त्यामुळे आता न्यायालय या प्रकरणी काय निर्णय देईल याकडे लक्ष लागले आहे.