राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात अण्णा हजारे करणार उपोषण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला ठेवण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हंटले आहे, सरकारच्या सुपरमार्केट वाईन विक्रीच्या निर्णयामुळे राज्यातील मुलांच्यावर जी आमची खरी संपत्ती आहे. या बालकामध्येच उद्याचे महापुरूष निर्माण होणार आहेत. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे.

ही युवाशक्तीच राज्य आणि राष्ट्र घडवू शकेल यावर आमचा विश्वास आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक परिवाराचे उज्वल भविष्य ज्या मुलींना, युवतींना घडवायचे, जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती जगाला उद्धारी। या युवतींवर या वाईनच्या वातावरणाचा काय दुष्परिणाम होईल, एकूण समाजावर काय परिणाम होतील याचा सरकारने विचार केलेला दिसत नाही.

फक्त मिळणाऱ्या महसुलाचा मर्यादीत विचार केलेला दिसतो. ज्या सत्तेमध्ये समाज, राज्य, राष्ट्र हिताचा विचार नसेल अशी सत्ता काय कामाची? ज्यांनी राज्य चालवायचे आहे त्यांनी जनतेचा सल्ला न घेता आपल्या मनाला जे योग्य वाटते असे निर्णय घेणे म्हणजे लोकशाही नव्हे. लोकशाही ही लोकांची आहे.

ती लोकांची, लोकांनी, लोकसहभागातून चालविली पाहिजे अन्यथा इंग्रजांच्या आणि आमच्या हुकूमशाहीत फरक राहणार नाही. चौथी पाचवीतील विद्यार्थी सांगू शकेल की, वाईन ही समाजाला घातक आहे पण ज्यांनी राज्य चालवायचे आहे त्या सरकारला कळू नये ही बाब दुर्दैवी आहे.

आमच्या पन्नास वर्षापूर्वी गावात पस्तीस दारूभट्ट्या होत्या. आज 22 वर्षात गावात कोणत्याही दुकानात बीडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा सुद्धा विक्रीला नाही. आणि सरकार मात्र सुपरमार्केट आणि किराणा दुकानात वाईन ठेवण्याचा निर्णय करते. मी जीवनात वयाच्या पंचविसाव्या वर्षी निर्णय घेतला की, जोपर्यंत जगायचे ते गाव, समाज आणि देशाची सेवा करायची आणि ज्या दिवशी मरायचे ते गाव, समाज आणि देशाची सेवा करता करताच मरायचे.

लग्न करावे तर चूल पेटवण्यात वेळ जाईल. मग गाव, समाज आणि देशाची निष्काम भावनेने सेवा करता येणार नाही. हा धोका दिसायला लागला म्हणून वयाच्या पंचविसाव्या वर्षी लग्न नाही करायचे हा निर्णय घेतला. अविवाहित राहून गाव, समाज आणि देशाची निष्काम भावनेने सेवा करण्याचा निर्णय घेतला.

आज पर्यंत 84 वर्ष वयाच्या आयुष्यात फक्त गाव, समाज आणि देशाची सेवा करीत आलो आहे. गावात घर आहे, परिवार आहे, शेती आहे पण पंचेचाळीस वर्षात मी माझ्या घरात कधी गेलो नाही. भावांच्या मुलांची नावे काय आहेत ते मला माहित नाही. सैन्यातील पेन्शन मिळते त्यावर उदर निर्वाह चालतो.

आयुष्यात कोणाचीही कोणातीही आर्थिक मदत घेतली नाही. किंवा मदतीची कधी अपेक्षा ठेवली नाही. मला अमेरिका, दक्षिण कोरीया, कॅनडा अशा वेगवेगळ्या देशामध्ये करोड रूपयांचे पुरस्कार मिळाले पण ते समाज सेवेसाठीच अर्पण केले. जवळ ठेवले नाहीत. गावात श्री संत यादवबाबा मंदीरामध्ये झोपण्याचे बिस्तर आणि जेवणाचे ताट याशिवाय काहीच ठेवले नाही.

सुरूवातीला 1975 मध्ये मी माझ्या गावापासून गावच्या विकासाला सुरूवात केली. दहा वर्षात 1985 मध्ये ते राळेगणसिद्धी एक आदर्श गाव उभे झाले. त्यासाठी किती परिश्रम परिश्रम करावे लागले असतील ते फक्त शब्दाने सांगून कळणार नाही. राज्यातून, देशातून गाव पाहण्यासाठी लोक येऊ लागले. सोळा वर्षात महाराष्ट्र राज्य आणि विविध राज्यातून चौदा लाख लोकांनी गावाला भेटी दिल्या.

प्रेरणा घेऊन काही कार्यकर्ते ग्रामविकासाचे काम करू लागले. ही बाब सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्ट्या मला महत्वाची वाटते. चार जणांनी पी.एच.डी केली. तीन जण पी.एच.डी. करत आहेत. विकास आणि विकासाला लागलेली भ्रष्टाचाराची गळती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

ही दोन्ही कामे केल्याशिवाय गाव, समाज, आणि देशाला उज्वल भविष्य मिळणार नाही. राज्यामध्ये विकास कामांना भ्रष्टाचाराची गळती लागली असल्याने ती गळती थांबवण्यासाठी 1997 मध्ये भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास नावाने संस्था स्थापन केली. महाराष्ट्र राज्यात हजारो कि.मी प्रवास करून अथक परिश्रम करून 33 जिल्ह्यामध्ये 252 तालुक्यामध्ये भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास नावाचे फक्त चारित्र्यशील कार्यकर्त्यांचे संघटन उभे केले.

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी माहितीचा अधिकार, ग्रामसभेला जादा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, जनतेची सनद, लोकपाल कायदा, ग्रामरक्षक दल कायदा यासारखे दहा कायदे वेगवेगळ्या पक्ष पार्ट्यांच्या सरकारवर जनशक्तीचा दबाव निर्माण करून सरकारला भ्रष्टाचाराला आळा घालणारे दहा कायदे करायला भाग पाडले.

भ्रष्टाचाराला ज्यांनी आळा घालायचा असे गृहमंत्रीच जर पैसे जमविण्याच्या विचार करत असतील तर काय होणार या राज्याचे प्रश्न आहे. नुकतेच महाराष्ट्र सरकारने राज्यातील सुपरमार्केट आणि किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला ठेवण्याचा परवाना देण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत दुर्दैवी निर्णय असल्याने आमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी घातक असल्याने मी या सरकारचा निषेध करण्यासाठी प्राणांतिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधाने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना रजिस्टर पोस्टाने पत्रव्यवहार केला आहे. उत्तर नाही. माझे राज्यात उपोषण होईल त्यावेळी कार्यकर्त्यांनी माझ्या प्रमाणे सर्वांनी उपोषण करू नये.

कारण जनतेच्या हितासाठी मी वेळोवेळी बावीस वेळा उपोषणे केली आहेत. मी तारूण्यातच व्रत घेतले आहे की जोपर्यंत जगायचे आहे. तो पर्यंत समाज आणि देशाची सेवा करायची आहे. आणि ज्या दिवशी मरायचे ते समाज, राज्य आणि देशाची सेवा करता करताच मरायचे आहे. म्हणून मी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही विवाहित असल्यामुळे अण्णा हजारे ची उपोषणाची नक्कल करून चालणार नाही.

मात्र समाज आणि देशाचे मी काही देणे लागतो ही जाणीव ठेवून होईल तेव्हढी सेवा करावी. समाज, राज्य आणि देशाची सेवा यासाठीच मनुष्य जन्म आहे. राज्यातील बऱ्याच संस्था आणि संघटनांनी शासनाने घेतलेल्या वाईनच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक संघटना संपर्कात येत आहे. लवकरच राज्यातील अशा संस्था आणि संघटनांनी कोणत्याही पक्ष पार्टीच्या विरोधात आंदोलन न करता समाज, राज्य आणि राष्ट्र हिताचा विचार करून अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी आंदोलनाची दिशा काय असावी.

आंदोलन कुठपर्यंत करावे याचा विचार करण्यासाठी राज्यातील काही संस्था आणि संघटनांची बैठक आम्ही राज्याच्या वेगवेगळ्या विभागात घेण्याचा विचार करीत आहोत. सुपरमार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगीच्या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी आंदोलन केले जाईल असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.