file photo

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. विशेषतः काही मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुढे येत आहेत. वाढत्या भ्रष्टाचारामुळे सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. दुर्दैवाने असे चित्र दिसत आहे की, केंद्र सरकार असो की राज्य सरकार, भ्रष्टाचार रोखण्यासाठी दोन्ही सरकारे कोणतीही पावले उचलताना दिसत नाहीत.

सध्याचा लोकायुक्त हा मुख्यमंत्र्यांकडून नेमला जातो. कायद्याने स्वायत्तता नसल्यामुळे तो लोकायुक्त सक्षम नाही. अशा परिस्थितीत जनतेने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्याय कुणाकडे मागायचा? हा खरा प्रश्न आहे. म्हणून राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होण्यासाठी वयाच्या ८५ व्या वर्षी पुन्हा एकदा जनतेच्या हितासाठी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्याची वेळ येईल की काय असे वाटू लागले आहे.

राज्यातील कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जिल्हा व तालुका स्तरावर आंदोलनाच्या तयारीत रहावे. वेळ पडल्यास राज्यभर एक मोठे आंदोलन करावे लागेल. त्याशिवाय राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होणार नाही असे वाटते. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आजपर्यंत जे कायदे झाले त्या सर्व कायद्यापेक्षा आता होणारा लोकायुक्त कायदा भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र निर्माण करू शकेल असा मला विश्वास वाटतो.

कारण प्रस्तावित लोकायुक्त कायद्यामध्ये भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे अधिकार राज्यातील जनतेला दिले असून कायद्याने लोकायुक्तांना स्वायत्तता दिलेली आहे. त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण नाही. जनतेचे नियंत्रण राहणार आहे. हा कायदा झाल्यानंतर मी माहिती अधिकार कायद्याप्रमाणे लोकशिक्षण लोकजागृती साठी महाराष्ट्रभर फिरणार आहे.

मसुदा तयार झाल्यानंतर जनतेच्या माहितीसाठी इंटरनेटवर टाकणार आहे. जेणे करून भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हा कायदा किती क्रांतीकारी आहे हे राज्यातील जनतेला कळेल.

राज्यात आंदोलन करण्याची वेळ आलीच तर जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय कार्यकर्त्यांनी आपआपल्या जिल्हा, तालुका स्तरावर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, तहसिलदार, पोलिस स्टेशन यांच्याकडून अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्याची परवानगी घ्यावी. कुठेही हिंसा होऊ नये याची खबरदारी घ्यावी.