अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- पिपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनी महिलांच्या हक्कासाठी सत्याग्रह करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मानवी मुल्य पायदळी तुडवून जगातील मानवजातीस वेठीस धरणारे तालिबान, पाकिस्तान व चीन हे देश एकवीसाच्या शतकातील उन्नतचेतना भक्षी कृष्णविवर असल्याचे आणि भारतामध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जा देणार्‍यांना संघटनेच्या वतीने मनु-तालिबानी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली.

महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनी शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे हा सत्याग्रह केला जाणार आहे. भारतात महिलांना एकविसाव्या शतकात देखील दुय्यम दर्जा दिला जात आहे.

मंदिर, दर्गा व इतर धार्मिक स्थळात त्यांना प्रवेश नाकारला जातो. तसेच इतर क्षेत्रात देखील लिंग भेद करुन महिलांना कमी लेखण्याचे प्रकार सुरु आहे.

महात्मा गांधी यांची जयंती उन्नतचेतनेचा अतिविकसित आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून जगभर साजरी केली जाते. अशा परिस्थितीमध्ये महिलांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेऊन त्यांचे शोषण केले जात आहे.

त्यांना शिक्षण नाकारुन फक्त घरात डांबून ठेऊन चुल व मुल पुरते मर्यादीत ठेवणे हे स्त्री जातीचे अपमान असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. प्रत्येकाच्या जीवनात आई, बहिण, पत्नी म्हणून स्त्री चे असतित्वत आहे.

जन्मदात्यावरच सूड उगविण्याचा हा प्रकार असून, महिलांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी हा सत्याग्रह महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनी त्यांना अभिवादन करुन केला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.