अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-पारनेर तालुक्यातील तहसीलदार यांनी कोरोना मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी त्यांचे नातेवाईक आले नसल्याने त्यांनी स्वत: अंत्यविधी केल्याचे वृत्त प्रसारमाध्यम व वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
पारनेर तहसिलदार यांनी वडिलांच्या अंत्यविधीसाठी येऊ नका सांगून स्वत:च अंत्यविधी उरकून प्रसिध्दी मिळवून त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी केल्याचा आरोप मयताचा मुलगा रमेश खोडदे व अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी केला आहे.
सदर प्रकरणी चौकशी करुन पारनेर तहसिलदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आले आहे. रमेश गोमाजी खोदडे सध्या कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहे.
त्यांच्या वडिलांचे कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील कोविड सेंटरमध्ये 19 एप्रिल रोजी निधन झाले. मोठा भाऊ के.ई.एम. हॉस्पिटल मुंबई येथे कोरोनाच्या उपचारासाठी दाखल होता. विजय आहिरे यांनी फोन करुन वडिलांच्या निधन झाल्याची माहिती दिली.
सायंकाळी पारनेर तहसिलदार यांनी फोन करुन अंत्यविधीसाठी येणार की नाही? याबाबत विचारणा केली. त्यांच्या मुलाने त्यांना आंम्ही निघालो असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी दहा ते पंधरा मिनीटात आंम्ही अंत्यविधी करुन घेत आहोत तुम्ही येऊ नका, असे स्पष्ट केले.
त्यांनी अंत्यविधी करु नका, आमचे जवळचे नातेवाईक येत असल्याने थांबण्याची विनंती केली. मात्र त्यांनी फोन ठेऊन दिला. त्यानंतर पुन्हा फोन करुन पारनेर तहसिलदार यांनी तुम्हाला व्हिडिओ कॉल करुन अंत्यदर्शन देणार असल्याचे सांगितले.
मात्र व्हिडिओ कॉल करुन शेवटच्या क्षणी वडिलांचा चेहरा न दाखवता एकदम अग्नी देताना दाखविले व अंत्यदर्शन झाल्याचे सांगितले. दुसर्या दिवशी सकाळी कर्जुले हर्या येथील कोविड सेंटरला गेलो असता वडिलांचे कपडे देण्यात आले.
मात्र त्यांचा आधारकार्ड व रेशनकार्ड देण्यात आले नाही. सदर कोविड सेंटरच्या डॉक्टरांनी 20 हजार रुपयाची मागणी केली. अन्यथा केस पेपर व मृत्यू दाखल्यासाठी कागदपत्र देणार नसल्याचे सांगितले. तसेच वडिलांच्या अस्थीसाठी तहसिलदार यांना फोन केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
तसेच तहसिलदार यांनी त्यांच्या फेसबुक पेज व सोशल मिडीयावर दोन मुले असून सुध्दा अंत्यविधीला येऊ शकले नसून, स्वत: अग्नीडाग दिल्याचे फोटो व मजकूर पोस्ट केला.
तसेच या संबंधीच्या बातम्या देखील वृत्तपत्र व माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्याने कुटुंबीयांची मोठी बदनामी झाली असल्याचा आरोप मयताचा मुलगा रमेश खोदडे व रोडे यांनी केला आहे. मुलगा अंत्यविधीसाठी येत असताना
देखील पारनेर तहसिलदार यांनी घाईघाईने अंत्यविधी उरकून स्वत:ची वाहवाह होण्यासाठी खोटी माहितीचे वृत्त पसरविले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तर तहसिलदार यांना सहानूभुती घेऊन प्रसिध्दी हवी होती का? हा प्रश्न तक्रारदाराने उपस्थित केला असून,
वडिलांच्या अंत्यविधीपासून वंचित ठेऊन प्रसिध्दीसाठी सदर कुटुंबीयांची बदनामी करुन परस्पर अंत्यविधी करणार्या पारनेर तहसिलदार यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मयताचा मुलगा रमेश खोडदे व समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी केली आहे.