अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :-सध्याच्या कोरोना प्रतिबंधकाळात गरजवंतासाठी शिवभोजन मोफत केले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाकडून सुरू असतानाच
काल राज्य सरकारकडून जिल्ह्यासाठी शिवभोजन थाळी संख्येत १ हजार ७५० थाळ्यांची वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे जिल्हयातील शिवभोजन थाळींची एकूण संख्या प्रतिदिवस ५ हजार २५० झाली असून २९ केंद्रांना दीडपट स्वरूपात या वाढीव थाळी विभागून देत या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निर्देशात सुरू केली
असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली. मागील वर्षी २६ जानेवारीपासून राज्यभरात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संवेदनशील संकल्पनेतील ‘ शिवभोजन ‘ योजनेची अंमलबजावणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या निगराणीत होत आहे.
नगर जिल्हयात सुरूवातीच्या काळात मंजूर असलेली केंद्र व थाळी संख्या वाढती मागणी लक्षात घेत शासन निर्णयानुसार वाढत गेली.
कोरोना लॉकडाउन काळात शिवभोजनाने आधार दिला. सध्या नगर शहरासह जिल्ह्यात एकूण २९ शिवभोजन केंद्रातून प्रतिदिवस ३ हजार ५०० थाळी मंजूर आहेत.
सुरुवातीला १० रूपये प्रतिथाळी असलेला दर ३१ मार्चच्या अवधीसाठी पाच रुपये करण्यात आला. सध्या वाढते कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १ मे पर्यंत सुधारीत निर्बंध जारी केले.
मात्र, गरीबांची काळजी घेत शिवभोजन मोफत केले. आता काल शुक्रवारी जिल्ह्यातील थाळीची संख्या १ हजार ७५० ने वाढवली आहे. त्यामुळे आता प्रतिदिवस थाळी संख्या ५ हजार २५० झाली आहे. सध्या मंजूर असलेल्या २९ केंद्रांना या थाळी विभागून देण्यात आल्या आहेत