अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनपासून देशात नव्या निकषानुसार लसीकरम मोहीम हाती घेतली आहे. अन्य राज्यांनी लसीकरणाचा विक्रम केला, तसाच महाराष्ट्रानेही एकाच दिवसात सात लाख २६ हजार ५८८ नागरिकांचे लसीकरण करून एक नवा विक्रम केला आहे.
तीन कोटी नागरिकांचे लसीकरण कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. आजदेखील त्यात अजून एका विक्रमाची भर पडली असून सायंकाळी सात वाजेपर्यंत सात लाख २६ हजार ५८८ नागरिकांना लस देण्यात आली.
एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत तीन कोटी ९ लाख ७९ हजार ४६० लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
लसीकरण मोहिमेला गती लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. ही लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला असून त्यामुळे लक्षणीय कामगिरीची नोंद होत आहे. दर दिवशी आधीच्या दिवसाच्या विक्रमी कामगिरीपेक्षा सरस कामाची नोंद होत आहे.
शुक्रवारी राज्याने तीन कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला तर आज दिवसभरात ७ लाखांहून अधिक लस देण्याची विक्रमी नोंद महाराष्ट्राच्या नावाने नोंदविण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
सहा दिवसांत चार कोटी नागरिकांना लस गेल्या सहा दिवसांत देशात तब्बल ३.७७ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
या अनुषंगाने आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन लसीकरणाचा आढावा घेतला.
या वेळी लसीकरणाचा वाढलेला वेग ही समाधानाची बाब असल्याचे नमूद करत याच पद्धतीने युद्धपातळीवर लसीकरण मोहीम पुढे न्यावी, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत.