अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-भारतासह संपुर्ण जगाला कोरोनाच्या खाईत लोटण्यास चीन जबाबदार असून, त्याला धडा शिकवण्यासाठी चीन विरोधात ग्लोबल डिस्टन्सिंग पाळण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.
तर नागरिकांना देखील चायना उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जैविक अस्त्र निर्माण करण्याच्या शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे कोरोनाच्या रुपाने तिसरे महायुद्ध चीनने पेटवले आहे. यामध्ये चीनच्या कोरोना विषाणूने भारतासह सगळ्याच राष्ट्रांना नाकीनऊ आणले.
भारतात कोरोनाच्या दुसर्या लाटेत लाखोंच्या संख्येने नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. कोरोना महामारीने भारताच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला असून, देश आर्थिकदृष्ट्या दहा वर्ष मागे गेला आहे. चीनने इतर देशांची अर्थव्यवस्था खिळखिळी करुन ठेवली आहे.
तर सध्या चीनचे जनजीवन सुरळीत सुरू असून, चीनची मागील दीड वर्षात अर्थव्यवस्था अतिशय गतीने पुढे आली आहे. अर्थव्यवस्थेबाबत जगातील महासत्ता म्हणून चीन पुढे आला आहे. आर्थिक गुलामगिरी लादण्याच्या हेतूने चीनची ही रणनिती असल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे.
हिटलर, स्टॅलिन, मुसोलिनी यांनी जग ताब्यात घेण्याच्या महत्वकांक्षेने मूर्खपणा करुन दुसरे महायुध्द केले. आज चीनने जैविक अस्त्रांचा वापर करुन तीसरे महायुध्दाची सुरुवात केली आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी सर्व जगाने एकत्र येऊन त्याला वाळीत टाकले पाहिजे.
भारतीय नागरिकांनी सर्वच चायना उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची गरज आहे. चीनचे राज्यकर्ते क्रूर असून, महासत्ता होण्याच्या अपेक्षेने चीनने अमानवी कृत्य केले आहे. शेजारच्या राष्ट्रांना त्यांनी नेहमीच त्रास दिला आहे.
फाईव्ह जी च्या मदतीने भारतात प्रवेश करु इच्छिणार्या चीन विरोधात सर्व भारतीयांनी एकवटण्याची गरज असल्याचे अॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.
चीन विरोधात ग्लोबल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, वीरबहादूर प्रजापती, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा आदी प्रयत्नशील आहेत.