अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- डेंग्यु हा विषाणुमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. डेंग्यु तापाचा प्रसार हा स्वच्छ पाण्याच्या साठयामध्ये उत्पत्ती होणा-या एडिस ईजिप्ताय डासापासून होतो.
अचानक येणारा तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी इ. तोंडाची चव जाणे, मळमळ व उलटया होणे. शरीरावर लाल पुरळ येणे, हिरडयातून व नाकातून रक्तस्त्राव होणे अशी लक्षणे असून वाढती डासोत्पत्ती स्थाने, एडिस डासांची वाढती घनता,
परंपरागत पाणी साठयाची सवय व पध्दती, स्व्च्छतेचा अभाव, वाढती लोकसंख्या व राहणीमान, दूषित रुग्णांचे स्थलांतर, डासांच्या किटकनाशक प्रतिकार शक्तीत वाढ असे त्याचे वाढीचे कारणे आहेत.
डेंग्यू हा आजार रोखण्यासाठी घरातील पाणीसाठे 7 दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवू नयेत, यासाठी गावामध्ये पाणीपुरवठा विभागाच्या सहकार्याने आठवडयातील एक दिवस संपूर्ण कोरडा दिवस पाळण्यात यावा.
घरातील पाणीसाठयाच्या टाक्या, फ्रिज, कुलर, कुंडया आदींमधील पाणी दर 7 दिवसांनी बदलावे, घराभोवती पाणी साठणा-या टाकाऊ वस्तू, पत्र्याचे डबे, नारळाच्या करवंटया, रिकामे टायर्स, रिकामे शहाळे, फुटक्या बाटल्या,
खड्डे इ. डासोत्पत्ती स्थाने त्वरीत नष्ट करावीत व आपल्या घरचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके यांनी केले आहे.
डासोत्पत्ती स्थानांवर नियंत्रण राखण्यासाठी डासोत्पत्ती स्थानांमध्ये डासअळी भक्षक गप्पी मासे सोडावेत. यासाठी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डासअळी भक्षक गप्पी मासे मोफत उपलब्ध आहेत.
डासांपासून व्यक्तिगत संरक्षणासाठी नागरिकांनी पूर्ण बाहयाचे कपडे, डास प्रतिबंधक अगरबत्ती, मलम, तसेच मच्छरदाणीचा वापर करावा. गच्चीवरील व जमिनीवरील पाण्यांच्या टाक्यांची झाकणे घट्ट लावावीत,
तसेच सेप्टी टँकच्या व्हेंट पाईपला वरच्या बाजुला नॉयलॉन जाळी अथवा सुती फडके बांधावे. डासोत्पत्ती स्थाने निर्माण न केल्यास डास निर्माण होणार नाहीत व त्यामुळे हिवताप व डेंग्यु सारखे आजार होणार नाहीत हे लक्षात असू द्यावे.
वरील सर्व सुचनांचे पालन करुन दक्षता घेतल्यास डेंग्यु तापाचा प्रसार आपल्या गावत, शहरात होणार नाही यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे