अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ४ मार्चला आवश्यकता भासल्यास मतदान घेऊन सभापतीची निवड केली जाणार आहे.
नगरसचिव कार्यालयात आज मंगळवारी सकाळी ११ पासून दुपारी दीडपर्यंत व बुधवारी अकरा ते दुपारी एकपर्यंत नामनिर्देशन अर्जांचे वाटप केले जाईल.
गुरूवारी सकाळी स्थायी समिती सभागृहात छाननी झाल्यानंतर एकापेक्षा जास्त अर्ज शिल्लक राहिल्यास मतदान घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
दरम्यान महापालिकेतील आठ सदस्य १ फेब्रुवारीला निवृत्त झाले. त्यांच्या जागेवर नव्याने तेवढेच सदस्य निवडीसाठी महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी १० फेब्रुवारीला विशेष महासभा बोलावली होती.
महापाैर वाकळे यांनी पक्षीय कोटयानुसार शिवसेनेचे प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, रिता भाकरे, राष्ट्रवादीचे अविनाश घुले, समद खान, भाजपचे रवींद्र बारस्कर, वंदना ताठे व बसपचे मुदस्सर शेख यांची नियुक्ती केली.
नगरसचिव एस. बी. तडवी यांनी आयुक्तांच्या मान्यतेने सभापती निवडीच्या कार्यक्रमाबाबत विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठवला. विभागीय आयुक्तांनी सभापती निवडीला हिरवा कंदील दाखवला.